दिल्लीमधील गुन्हेगारीच्या घटना वारंवार समोर येत असतात. त्यातही महिलांसंदर्भात घडणारे गुन्हे पोलीस प्रशासनासाठी काळजीचा विषय ठरले आहेत. अशीच दिल्लीत घडलेली एक घटना नुकतीच समोर आली असून या घटनेचं भीतीदायक सीसीटीव्ही फूटेज आता बाहेर आलं आहे. एका तरुणीवर एका २२ वर्षीय तरुणानं भरदिवसा चाकूचे वार केल्याचा हा प्रकार दिल्लीच्या मुखर्जीनगर भागात घडला. त्याचवेळी तिथे आलेल्या दुचाकीस्वाराने मध्ये पडत तरुणाला पकडल्यामुळे पीडित तरुणीला गंभीर इजा झाली नाही. पण या घटनेमुळे आसपासच्या भागात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
नेमकं काय घडलं?
हा सगळा प्रकार २२ मार्च अर्थात गेल्या आठवड्यात शुक्रवारी घडला. दिल्लीच्या मुखर्जी नगर भागातल्याच एका ग्रंथालयात पीडित तरुणी रोज वाचनासाठी येते. त्या दिवशीही ती तरुणी अशाच प्रकारे वाचनासाठी तिथे आली असता अचानक आरोपी तरुणानं हातात चाकू घेऊन तिच्यावर वार करायला सुरुवात केली. बेभान झालेल्या तरुणानं चार ते पाच वेळा तरुणीवर चाकूने वार करून तिला जखमी करण्याचा प्रयत्न केला. पण या हल्ल्यात तरुणीला गंभीर दुखापत होऊ शकली नाही.
हा प्रकार घडत असतानाच तिथे दुचाकीवर आलेल्या दोन व्यक्तींनी मध्ये पडत तरुणाला बाजूला केलं. त्यांच्यावरही तरुणानं वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या दोघांनी त्याला अडवल्यामुळे आरोपी तरुणानं तिथून पोबारा केला. नंतर तरुणीला नजीकच्या रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आलं. यावेळी तरुणीला गंभीर दुखापत झाली नसल्याचं निष्पन्न झालं असून तिची प्रकृती ठीक असल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं.
हल्ल्याचं नेमकं कारण काय?
दरम्यान, इंडिया टुडेनं या घटनेच्या दिलेल्या वृत्तामध्ये हल्ल्याचं कारण देण्यात आलं आहे. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी काही तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. त्याची कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांनी जोडलेल्या दुव्यांनुसार या घटनेमागचा नेमका प्रकार समोर आला आहे.
सदर आरोपी मुखर्जी नगर भागात नेहमीच निर्हेतुक फिरत असे. कोणत्याही कामाशिवाय दिवसभर हा आरोपी या भागात हिंडत असताना अनेकांनी पाहिलं आहे. त्यामुळे अनेकजण त्याला वेडा म्हणूनही बोलत असत. त्यामुळे डोक्यात राग असलेल्या या तरुणाने हे कृत्य केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. या तरुणानं दिलेल्या जबाबानुसार पीडित तरुणीही त्याला अशाच प्रकारे अपमानित करत असल्यामुळे रागाच्या भरात बाजूच्याच भाजीवाल्याचा चाकू घेऊन त्याने तिच्यावर वार केले. या प्रकरणी दिल्ली पोलीस पुढील तपास करत आहेत.