रविवारी राजधानी दिल्लीत एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या संसद भवनाचं उद्घाटन करत असताना दुसरीकडे लैंगिक शोषणाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या महिला कुस्तीपटूंना दिल्ली पोलीस ताब्यात घेत होते. या आंदोलनाची आणि पोलिसांच्या कारवाईची अनेक छायाचित्रे आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. ब्रिजभूषण सिंह यांच्यावर आरोप करणाऱ्या या आंदोलक कुस्तीपटूंना पोलिसांनी दुपारी ताब्यात घेतलं तर संध्याकाळी त्यांना सोडून देण्यात आलं. या पार्श्वभूमीवर एकीकडे महिला कुस्तीपटू कारवाईवर टीका करत असताना दिल्ली पोलीस मात्र त्यांची कारवाई योग्यच असल्याची बाजू मांडत आहेत.
नेमकं काय घडलं?
रविवारी दुपारी आपल्या मागण्यांसाठी आंदोलक महिला कुस्तीपटू संसदेच्या दिशेनं मोर्चा काढण्यासाठी निघाल्या. नव्या संसदेचं उद्घाटन चाालू असताना तिथे कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित होऊ नये, म्हणून दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना जागेवरच अडवलं आणि तिथून थेट ताब्यात घेतलं. यानंतर जंतर-मंतरवरील आंदोलकांच्या ठिकाणावरील तंबू वगैरे गोष्टीही पोलिसांनी हटवल्या. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांच्या कारवाईसंदर्भात टीका होत असताना दिल्ली पोलिसांच्या उपायुक्त सुमन नलवा यांनी कारवाईचं समर्थन केलं आहे.
काय म्हणणं आहे दिल्ली पोलिसांचं?
“जंतर-मंतरवर गेल्या ३८ दिवसांपासून हे सगळे कुस्तीपटू आंदोलन करत आहेत. दिल्ली पोलीस त्यांना बऱ्याच सुविधा देत आहेत. या सुविधा आम्ही सामान्य परिस्थितीत आंदोलकांना देत नाही. यांच्याकडे जेनसेट्स, कॅन्टेज, पाण्याची सुविधा होती. हे कुस्तीपटू तिथे सलग थांबतही नव्हते. ते येत होते, जात होते. त्यांचे काही हितचिंतक किंवा सहकारी तिथे बसायचे. हे सगळं चालत होतं. आम्ही त्यांच्याकडून मागणी केल्या जाणाऱ्या सर्व सुविधा पुरवत होतो”, असं दिल्लीच्या पोलीस उपयुक्त सुमन नलवा यांनी म्हटलं आहे.
“२३ मे रोजी जेव्हा त्यांनी कँडल मार्चचं आवाहन केलं, तेव्हा आम्ही त्यांच्याशी बरीच चर्चा केली. आम्ही त्यांना सांगितलं की हा उच्च सुरक्षेचा भाग आहे. कोणतीही सुरक्षा यंत्रणा या रस्त्यांवर कोणतंही आंदोलन करण्यास परवानगी देऊ शकत नाही. त्यानंतरही ते अडून राहिले. तेव्हा बऱ्याच चर्चेनंतर आम्ही त्यालाही परवानगी दिली. तेही शांततेत पूर्ण झालं. पण काल कायदा व सुव्यवस्थेबाबत खूप महत्त्वाचा दिवस होता”, असं नलवा म्हणाल्या.
“आम्ही त्यांच्याशी चर्चा केली, पण…”
“आपल्या नव्या संसदेचं उद्घाटन होतं. त्यामुळे कोणतीही सुरक्षा यंत्रणा या प्रकारच्या आंदोलनाला परवानगी देऊ शकत नाही. त्यांच्याशी आम्ही चर्चा केली. पण त्यांनी काहीही ऐकायला नकार दिला. त्यानंतरही जेव्हा त्यांनी असं करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना ताब्यात घ्यावं लागलं. असं करताना त्यांनी खूप विरोध केला. आमच्या महिला पोलिसांनीच त्यांना ताब्यात घेतलं. त्यांना खूप प्रयत्न करावे लागले. कारण हे सगळे अॅथलिट आहेत. त्यांनी तिथे झोपून वगैरे खूप तमाशे केले. त्यानंतरही आमच्या महिला पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि संध्याकाळी त्यांना सोडून दिलं”, अशी भूमिका सुमन नलवा यांनी मांडली.
“कोणत्याही प्रकारच्या बळजबरीचा प्रश्नच येत नाही. हे सगळे गेल्या ३८ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. आम्ही त्यांना सर्व सुविधा देत आहोत. पण कालचा दिवस आमच्यासाठी फार महत्त्वाचा होता. आम्ही खूप शांततेनं त्यांना ताब्यात घेतलं. महिला पोलिसांनीच ताब्यात घेतलं आणि सूर्यास्ताच्या आधी त्यांना सोडून दिलं”, असंही त्या म्हणाल्या.