टोकियो ऑलम्पिकमध्ये पदक जिंकणारा बजरंग पुनिया आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप पदक विजेती विनेश फोगाट यांच्यासह देशातील अनेक कुस्तीपटूंनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन केलं आहे. विनेश फोगाट हीने भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला. तसेच प्रशिक्षकही महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण करतात, असा आरोपही तिने केला.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू अशाप्रकारे अंदोलनाच्या पवित्र्यात उतरल्याने क्रीडा क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर क्रीडा मंत्रालयाने गुरुवारी ७२ तासांच्या आत उत्तर देण्याचे आदेश भारतीय कुस्ती महासंघाला (WFI) दिले. यानंतर कुस्ती महासंघाने आज क्रीडा मंत्रालयाला पत्र लिहिलं असून महिला कुस्तीपटूंनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले.
हेही वाचा- अन्वयार्थ : शोषक मानसिकतेची लक्तरे
भारतीय कुस्ती महासंघाने (WFI) शनिवारी क्रीडा मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात म्हटलं की, “आम्ही लैंगिक छळाच्या एकाही आरोपाचा स्वीकार करत नाही. WFI च्या लैंगिक छळ समितीकडे अशा प्रकारची कोणतीही तक्रार यापूर्वी कधीही आली नाही. त्यामुळे या प्रकरणात कोणतेही सत्य आढळत नाही. असे आरोप होणं दुर्भाग्यपूर्ण आणि निराधार आहेत.”
हेही वाचा- महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण आणि जीवे मारण्याची धमकी; बृजभूषण सिंह यांच्यावर विनेश फोगाटचे गंभीर आरोप
कुस्ती महासंघाने पुढे म्हटलं की, “भारतीय कुस्ती महासंघ हे सरकारचे धोरण, नियम, कायदे, सूचना इत्यादींद्वारे चालते. WFI चा अध्यक्ष किंवा इतर कोणत्याही पदाधिकाऱ्यांच्या वैयक्तिक इच्छा आणि आवडीनुसार ही संस्था व्यवस्थापित केली जात नाही.” “आंदोलक कुस्तीपटूंनी पत्रकार परिषद घेऊन केलेले आरोप हे वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा डब्ल्यूएफआयची बदनामी करण्यासाठी रचलेल्या मोठ्या कटाचा भाग आहे,” असा आरोपही कुस्ती महासंघाने पत्राद्वारे केला.
हेही वाचा- विश्लेषण: जंतरमंतर का बनले कुस्तीगिरांचा आखाडा? कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांवर आरोप नेमके काय?
“WFI चे व्यवस्थापन हे घटनेनुसार निवडून आलेल्या लोकांद्वारे चालवलं जातं. त्यामुळे WFI मध्ये अध्यक्षांसह इतर कोणत्याही पदाधिकाऱ्याद्वारे वैयक्तिकरित्या कोणतीही मनमानी कारभार केला जाऊ शकत नाही,” असंही WFI ने क्रीडा मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात म्हटलं.