आम आदमी पक्षाच्या एका महिला कार्यकर्ताने पक्षाचे नेते कुमार विश्वास यांच्याविरोधात अनैतिक संबंध ठेवल्याचा आरोप करत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आता महिला आयोगाने विश्वास यांना जाहीर स्पष्टीकरण देण्याची नोटीस धाडली आहे. दिल्ली महिला आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, अनैतिक संबंधांच्या आरोपावरून कुमार विश्वास यांना स्पष्टीकरण देण्याचे समन्स पाठवले आहेत. त्यासाठी मंगळवारपर्यंत महिला आयोगासमोर उपस्थित राहण्यास कुमार विश्वास यांना सांगण्यात आल्याचे समजते. आरोप करणारी महिला आपचीच कार्यकर्ता असून लोकसभा निवडणुकीत अमेठीमध्ये कुमार विश्वास यांच्यासोबत तिने प्रचार देखील केला आहे आणि आता हा तिच्या इभ्रतीचा प्रश्न आहे. त्यामुळे विश्वास यांनी यावर स्पष्टीकरण द्यायलाच हवे, असे महिला आयोगाचे म्हणणे आहे. दरम्यान, या प्रकरणावरून आम आदमी पक्ष कुमार विश्वास यांच्या पाठीशी उभा राहिला असून विश्वास यांच्यावर करण्यात आलेले आरोप धांदात खोटे असल्याची प्रतिक्रिया आपचे नेते संजय सिंह यांनी दिली आहे. आम आदमी पक्षाला मुद्दाम लक्ष्य केले जात असून करण्यात आलेल्या आरोपांना काहीच आधार नसल्याचेही ते पुढे म्हणाले. तर, कुमार विश्वास यांनी मीडिलाच लक्ष्य केले. देशातील मीडियावर भाजपचे वर्चस्व असून आम आदमी पक्षाची प्रतिमा मलिन करण्यासाठी अशाप्रकारचे खोटे आरोप करण्याचे उद्योग केले जात असल्याचे विश्वास यांनी ट्विट केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, कुमार विश्वास यांनी आपल्याशी अनैतिक संबंध ठेवले असल्याचा आरोप या पीडित महिला कार्यकर्ताने केला आहे.

Story img Loader