काँग्रेस नेते राहुल गांधी आणि आसामचे मुख्यमंत्री हिंमता बिस्व सरमा यांच्यातील संघर्ष टोकाला गेला आहे. मंगळवारी सरमांनी राहुल गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राहुल गांधी आणि अन्य नेत्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. आता लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींना आसाम पोलीस अटक करतील, असा इशारा हिंमता बिस्व सरमांनी दिला आहे.
नेमकं प्रकरण काय?
राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ मंगळवारी गुवाहाटीत प्रवेश नाकारण्यात आला. शहरात वाहतुकीची कोंडी होईल, असं कारण देत मुख्यमंत्री हिंमता बिस्व सरमांनी परवानगी नाकारली. पण, काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुवाहाटीत पोलिसांनी उभारलेले बॅरिकेड तोडण्याचा प्रयत्न करत घोषणाबाजी केली.
त्यानंतर पोलिसांनी कट रचणे, सार्वजनिक कामात अडथळा आणणे, बेकायदेशीर सभा यासह विविध कलमांखाली राहुल गांधी, जितेंद्र सिंग, के.सी वेणुगोपाल, जयराम रमेश, श्रीनिवास बीव्ही, कन्हैया कुमार, गौरव गोगोई यांच्यासह अन्य काही नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“आसाममध्ये आम्हीच निवडणूक जिंकणार आहोत”
याबाबत बोलताना सरमा म्हणाले, “आम्ही लोकसभा निवडणूक झाल्यावर राहुल गांधींना अटक करू. आता अटक केल्यास राजकारण होईल. एसआयटी तपास करत आहे. लोकसभा निवडणुकीआधी राहुल गांधींवर कुठलीही कारवाई करणार नाही. कारण, आसाममध्ये आम्हीच निवडणूक जिंकणार आहोत. आसाममध्ये राजकारण करण्यात अर्थ नाही.”