केंद्र सरकारने १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनाचा अजेंडा त्यांनी अद्यापही गोपनिय ठेवला असून यावरून विरोधकांनी केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे. नेमक्या कोणत्या मुद्द्यांवरून विशेष अधिवेशनात चर्चा होणार याबाबत खुलासा न झाल्याने काँग्रेसनेही यावरून टीका केली आहे. दरम्यान, मोदी चालिसा ऐकण्यासाठी आम्ही अधिवेशनात बसणार नाही, अशी ठाम भूमिका काँग्रेसने घेतली आहे. काँग्रेस संसदीय पक्षाची काल (५ सप्टेंबर) बैठक झाली. या बैठकीत सोनिया गांधी, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे उपस्थित होते.
काँग्रेसच्या बैठकीआधी इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झाली होती. काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश म्हणाले की, “सरकारने विरोधी पक्षांना विश्वासात घेतले नाही आणि आगामी अधिवेशनाच्या अजेंड्यावर चर्चा केली नाही हे पहिल्यांदाच घडले आहे. पाच दिवसांच्या बैठकीत केवळ सरकारी कामकाज करणे अशक्य आहे.”
काँग्रेस अधिवेशनात होणार सहभागी
“आम्ही फक्त मोदी चालिसासाठी बसणार नाही. आम्ही सरकारकडे आमच्या मागण्या लावून धरू आणि प्रत्येक अधिवेशनात आमचे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करू. पण, मागील अधिवेशनात ते मांडण्याची संधी मिळाली नाही. आम्हाला आशा आहे की विरोधकांनाही बोलण्याची संधी मिळेल. आमची मागणी आहे की जनतेच्या मुद्द्यांवर चर्चा व्हावी आणि याच भावनेने आम्ही या विशेष अधिवेशनात सहभागी होऊ”, असं जयराम रमेश यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा >> Prime Minister of Bharat : नरेंद्र मोदी इंडियाचे नव्हे, भारताचे पंतप्रधान; सरकारी पुस्तिकेतही नाव बदललं!
ते म्हणाले की, “जेव्हा जेव्हा विशेष अधिवेशन बोलावले जाते तेव्हा सर्व पक्षांना अजेंडा अगोदरच सांगितला जातो. एक व्यापक अजेंडा तयार केला जातो आणि विरोधी पक्षांसह विविध पक्षांशी चर्चा केली जाते. भारतातील आघाडीच्या पक्षांवरून लक्ष विचलित करण्यासाठी पंतप्रधानांनी संसदेचे पाच दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावले आहे”, अशीही टीका त्यांनी केली.
“या अधिवेशनात फक्त सरकारी कामकाजाचा उल्लेख करण्यात आला आहे. पाच दिवस फक्त सरकारी कामकाज कसं चालेल? अजेंड्याबाबत काहीच माहिती का दिली नाही? संसदेच्या विशेष अधिवेशनात आर्थिक आणि राजकीय मुद्द्यांसोबतच परराष्ट्र धोरण आणि सीमांबाबतही चर्चा व्हावी, अशी आमची इच्छा आहे”, असंही जयराम रमेश म्हणाले.