देशातील वाढत्या मॉब लिंचिंगच्या घटनांवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. “लिंचिंग” हा शब्द २०१४ पूर्वी प्रत्यक्षात कधी ऐकला नव्हता,  असं त्यांनी म्हटलंय. देशात भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मॉब लिंचिंगच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पंजाबसह देशातल्या अन्य राज्यांमध्ये गेल्या काही दिवसात लिंचिंगच्या घटना घडल्या आहेत. त्यावरून राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर टीका केली.

“२०१४ पूर्वी, ‘लिंचिंग’ हा शब्द प्रत्यक्षात ऐकला नव्हता. मोदीजी तुमचे आभार,” असं राहुल गांधींनी ट्वीटमध्ये म्हटलंय.

पंजाबमध्ये २४ तासात दोघांची हत्या..

दरम्यान, रविवारी पंजाबमधील कपूरथला येथील निजामपूर गावात एका गुरुद्वारामध्ये शीख धर्माच्या ‘निशान साहिब’ अनादर केल्याबद्दल जमावाने अज्ञात व्यक्तीची हत्या केली होती. याआधी शनिवारी, अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात पावित्र्य भंग केल्याप्रकरणी जमावाने आणखी एका व्यक्तीला बेदम मारहाण केली होती.  या घटनांवरून राहुल गांधींनी मोदींना लक्ष्य केलंय.

भाजपाकडून प्रत्युत्तर..

राहुल गांधींच्या टीकेनंतर भाजपाने यावर प्रतिक्रिया दिली आहे. १९८४ च्या दंगलीची आठवण करून देत भाजपा नेते अमित मालवीय यांनी राहुल गांधींसह संपूर्ण काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे. “मॉब लिंचिंगचे जनक राजीव गांधींना भेटा. काँग्रेस रस्त्यावर उतरली, ‘खून का बदला खून से लेंगे’ अशा घोषणा दिल्या, महिलांवर बलात्कार केला, शीख पुरुषांच्या गळ्यात जळते टायर गुंडाळले, तर नाल्यात टाकलेल्या जळलेल्या मृतदेहांचे कुत्र्यांनी लचके तोडले होते,” असं मालवीय यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय.