आगरतळापासून ते शेजारच्या बांगलादेशातील अखौरा यांना जोडणाऱ्या १५.०५ कि.मी.च्या रेल्वेमार्गाचे काम पुढील फेब्रुवारी महिन्यापासून सुरू करण्यात येणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी येथे सांगितले. आगरतळा-अखौरा रेल्वे प्रकल्पाच्या सुकाणू समितीची बैठक ढाक्यात गेल्या मंगळवारी झाली त्या वेळी हा निर्णय घेण्यात आला. त्रिपुराचे परिवहन सचिव किशोर अंबुली हे समितीचे सदस्य असून ते या बैठकीला उपस्थित होते. सदर प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया बांगलादेशातील सार्वत्रिक निवडणुकांनंतर फेब्रुवारी महिन्यात सुरू करण्यात येणार आहे. प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्यात आल्यानंतर लोहमार्ग टाकण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे, असेही अंबुली म्हणाले.
सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम प्रथम ‘इरकॉन’ या भारतीय रेल्वेच्या उपक्रमाच्या वतीने करण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र त्यानंतर ते एनएफ रेल्वेकडे सोपविण्यात आले, असेही ते म्हणाले.
लोहमार्ग टाकण्याच्या कामासाठी भारताने २५२ कोटी रुपये मंजूर केले आहेत. एकूण १५.०५ कि.मी.च्या मार्गापैकी केवळ पाच कि.मी. मार्ग भारतीय हद्दीत आहे. ब्रॉडगेज मार्गावर मीटरगेज मार्गाचे काम करण्यात येणार असून गरज भासल्यास त्याचे पुन्हा ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करता येणार आहे.

Story img Loader