मुंबई – अहमदाबाद या बुलेट ट्रेन म्हणजेच हाय स्पीड रेल्वेच्या मार्गातील अडथळे आता दूर होत आहेत. काही दिवसांपूर्वी ठाणे महानगरपालिकेच्या भागातील भूसंपादन प्रक्रियेला मान्यता देण्यात आली होती. ठाणे, पालघर जिल्ह्यातील भूसंपादन प्रक्रिया सध्या जोरात सुरु आहे. असं असलं तरी महाराष्ट्रातून जाणाऱ्या बुलेट ट्रेनच्या मार्गावर अजुन प्रत्यक्ष काम सुरु झालेलं नाही. तर दुसरीकडे गुजरातमध्ये बुलेट ट्रेनच्या कामाने वेग घेतला आहे.
असं असतांना भूसंपादन प्रक्रियेतील अडथळे दूर होत असल्याने आता महाराष्ट्रात बुलेट ट्रेनच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. कारण बुलेट ट्रेनच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स ते शीळफाटा या २१ किलोमीटर लांबीच्या भूयारी मार्गासाठी नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने निविदा प्रक्रिया सुरु केली आहे. यामुळे पुढील काही महिन्यांत बुलेट ट्रेनच्या प्रत्यक्ष कामाला मुंबईत सुरुवात झालेली बघायला मिळेल.
बुलेट ट्रेन प्रकल्प कसा आहे ?
एकुण ५०८ किलोमीटर लांबीचा मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग असणार आहे. मुंबईत वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स पासून या मार्गाची सुरुवात होणार असून भुयारी मार्गाने ही रेल्वे ठाणे-शीळफाटापर्यंत जाणार आहे. त्यानंतर विरार,पालघर या भागातून ही रेल्वे गुजरातमध्ये प्रवेश करणार आहे. या मार्गावर एकुण १२ रेल्वे स्थानके असतील. मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर जास्तीत जास्त ३२० किलोमीटर प्रति तास या वेगाने ही रेल्वे धावणार असून हे अंतर दोन तास ७ मिनीटांत पार केले जाणार आहे. या प्रकल्पावर एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे खर्च होणार आहेत. मुंबई-अहमदाबाद प्रकल्प मार्गी लागत असतांना आता मुंबई ते नागपूर आणि मुंबई ते हैद्राबाद या बुलेट ट्रेनच्या मार्गासाठीही हालचाली सुरू झाल्या आहेत.
सुरुवातीला शिवसेनेसह काही राजकीय पक्ष तसंच विविध संघटनांचा, अनेक गावांचा या प्रकल्पाला विरोध होता. मोठ्या प्रमाणात शेतजमिन जात असल्याने शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला विरोध केला होता. पण गेल्या काही दिवसात भूसंपादन प्रक्रिया वेगाने केली जात असल्याचं चित्र आहे. विशेषतः दिल्लीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर बुलेट ट्रेन प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध मावळल्याचं दिसून आलं.