आपल्या विरोधातील उमेदवाराचे निवडणूक चिन्ह कप-बशी असल्याने कपबशीतून चहा पिऊ नये अशा सूचना एका राजकीय पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. कप-बशी ऐवजी ग्लासमधून चहा प्यावा असा सल्लाही देण्यात आला आहे. हरयाणातील एका राजकीय नेत्याने हा प्रश्न उपस्थित केल्याने यावर चर्चा रंगू लागल्या आहेत.
जननायक जनता पार्टीचे (जेजेपी) संयोजक आणि हिस्सारचे खासदार दुष्यंत चौटाला यांनी आपला जुना पक्ष इंडिअन नॅशनल लोकदलावर (इनेलो) टीका केली आहे. रविवारी एका सभेत बोलताना दुष्यंत म्हणाले, मला असं कळलंय की, इनेलोने आपल्या कार्यकर्त्यांना कप आणि बशीमध्ये चहा पिण्यास मनाई केली आहे. याचे कारण हे आहे की, कपबशी हे जेजेपीचे नगरसेवक दिग्विजय चौटाला यांचे निवडणूक चिन्ह आहे.
दुष्यंत म्हणाले, इनेलो कार्यकर्त्यांना ग्लासमध्ये चहा पिण्यास सांगण्यात येत आहे. कारण कपबशीवर त्यांच्या पक्षाने बंदी घातली आहे. ते इतके घाबरले आहेत की ते आमच्याबाबत खोट्या बातम्या पसरवत आहेत. जिंद येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.