मुलींना घरातील मुलांप्रमाणेच वाढवायला हवं, असं मत माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी शनिवारी व्यक्त केलं. असं केल्यास त्यांच्यामध्ये भविष्यातील नेते घडवण्यात यश येऊ शकतं, असंही त्या म्हणाल्या. याशिवाय नोकरी करणार्या महिलांनी आई कधी व्हावं, याचा निर्णय खूप काळजीपूर्वक घ्यायला पाहिजे, असा सल्ला दिला. कारण, त्याचा त्यांच्या करिअरवर परिणाम होतो, असं त्या म्हणाल्या.
आंतरराष्ट्रीय महिला दिनापूर्वी ‘वुमन पॉवर, ए ग्लोबल मूव्हमेंट’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात बोलताना, समाजाने विशेषत: पालकांनी आणि शाळांनी मुलींना नेतृत्वगुण शिकवणाऱ्या खेळासाठी प्रोत्साहित केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी मुलींना शिक्षण घेताना कोणकोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते, कोणत्या अडथळ्यांवर मात करावी लागते, याबद्दल आपले अनुभव शेअर केले.
“तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असल्याशिवाय किंवा कोणी गृहिणी म्हणून निवडल्याशिवाय तुम्ही लग्न करू नये,” असं त्या म्हणाल्या. किरण बेदी यांनी आई झाल्यानंतर करिअर आणि घर या दोहोंचा समतोल साधत मुलांचे संगोपन करताना नोकरदार महिलांना येणाऱ्या आव्हानांबद्दल सांगितले. “नोकरी करणाऱ्या महिलांनी आई केव्हा व्हायचे, याचा निर्णय अतिशय काळजीपूर्वक घ्यायला पाहिजे. कारण इतर कोणीही आईची जागा कधीच घेऊ शकत नाही,” असं त्या म्हणाल्या.