World 100 Most Influential People 2025 : ‘टाइम’ मॅगेझीनने २०२५ मधील जगातील १०० सर्वाधिक प्रभावी व्यक्तींची यादी नुकतीच जाहीर केली. या यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क, बांग्लादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांच्यासह जगभरातील विविध क्षेत्रातील दिग्गजांना स्थान देण्यात आलं आहे. विशेष बाब म्हणजे, ‘टाइम’ मॅगेझीनच्या यादीत भारतातील एकाही व्यक्तीचा समावेश नाही. रेश्मा केवलरमानी या यादीत स्थान मिळविणाऱ्या भारतीय वंशाच्या एकमेव महिला आहेत. २०२४ मध्ये, बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि ऑलिंपिक कुस्तीगीर साक्षी मलिक यांचा जगातील १०० प्रभावी व्यक्तींच्या यादीत समावेश होता.
कोण आहेत रेश्मा केवलरमानी?
रेश्मा केवलरमानी या अमेरिकेतील बायोटेक्नॉलॉजी कंपनी ‘Vertex Pharmaceuticals’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ‘टाइम’ मॅगेझीनच्या यादीत समाविष्ट झालेल्या त्या एकमेव भारतीय वंशाच्या महिला आहेत. रेशमा यांचा जन्म मुंबईत झाला आणि वयाच्या ११ व्या वर्षी त्या कुटुंबासहीत भारतातून अमेरिकेत स्थायिक झाल्या. १९८८ मध्ये रेशमा यांनी अमेरिकेतील बेस्टन विद्यापीठातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं. मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमधून फेलोशिप घेतल्यानंतर, २०१५ मध्ये त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून जनरल मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतली.
२०१८ मध्ये रेशमा व्हर्टेक्स फार्मास्युटिकल्समध्ये मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाल्या. २०२० मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. रेशमा केवलरामणी यांच्या नेतृत्वाखाली व्हर्टेक्सने एक ऐतिहासिक टप्पा गाठला. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) पहिल्यांदाच CRISPR तंत्रज्ञानावर आधारित सिकल सेल आजारावर उपचार करणाऱ्या औषधाला मान्यता दिली. रेशमा अमेरिकेच्या ‘Ginkgo Bioworks’ या बायोटेक कंपनीच्या संचालक मंडळावरही कार्यरत आहेत.
आणखी वाचा : भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची ‘या’ तारखेला होणार निवड? बैठकीत काय चर्चा झाली?
यादीत कोणकोणत्या व्यक्तींना स्थान?
‘टाइम’ हे एक अमेरिकेतील प्रतिष्ठित मासिक आहे. दरवर्षी या मासिकाकडून जगातील सर्वात प्रभावशाली अशा १०० लोकांची यादी जाहीर केली जाते, यात अनेक मोठ्या लोकांचा समावेश असतो. या मॅगझीनचा वाचकवर्ग यासाठी मतदान करतो. यावर्षी ‘टाइम’ने रोलेक्स कंपनीबरोबर मिळून सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी तयार केली आहे. या यादीत जगभरातील ३२ देशांतील १०० प्रभावी व्यक्तींचा समावेश आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह त्यांच्या प्रशासनातील तब्बल सहा व्यक्तींना ‘टाइम’च्या यादीत स्थान मिळालं आहे. विशेष बाब म्हणजे, २००९ नंतर, एकाच प्रशासनातील इतक्या मोठ्या व्यक्तींना या यादीत एकाचवेळी स्थान मिळालेलं नव्हतं.
‘टाइम’च्या यादीची तीन श्रेणींमध्ये विभागणी
‘टाइम’ मॅगेझीनची यादी तीन श्रेणींमध्ये विभागण्यात आली आहे. त्यांना लीडर्स, टायटन्स, आयकॉन्स अशी नावे देण्यात आली आहेत. या यादीतील ‘लीडर्स’ श्रेणीत ब्रिटनचे पंतप्रधान कीर सार्मर, शांततेचं नोबल मिळालेले मोहम्मद युनूस, अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हॅन्स यांचा समावेश आहे. याशिवाय न्याय आणि लोकशाहीसाठी लढणाऱ्या नऊ व्यक्तींना यादीत स्थान देण्यात आलं आहे. यादीतील सर्वात तरुण व्यक्ती २२ वर्षीय फ्रेंच ऑलिंपिक जलतरणपटू लिओन मार्चंड आहे. तर यादीतील सर्वात वयस्क व्यक्ती नोबेल पारितोषिक विजेते आणि बांगलादेशचे अंतरिम नेते मोहम्मद युनूस आहेत.
यादीत सर्वाधिक वेळा नाव कुणाचं?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सलग सातव्यांदा यादीत समाविष्ट होण्याचा मान पटकावला आहे. त्यांच्यानंतर एलॉन मस्क (Tesla) ६ वेळा, मार्क झुकरबर्ग (Meta) ५ वेळा, सेरेना विल्यम्स, सायमोन बाइल्स प्रत्येकी ३ वेळा, क्रिस्टन विग, एड शिरन, ब्लेक लाइव्हली, स्कार्लेट जोहान्सन यांचे नाव प्रत्येकी तीनवेळा यादीत समाविष्ट करण्यात आलेलं आहे. काही वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही नाव सर्वात प्रभावशाली व्यक्तींचे यादीत आले होते. टाइमच्या २०२४ च्या यादीत बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट व ऑलिम्पिक पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिकचं नाव होतं. मात्र, या वर्षी या यादीत एकही भारतीय नाही.
टाइमच्या यादीत कुणाला स्थान मिळतं?
चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांसारख्या दिग्गजांनाही या यादीत स्थान मिळालेलं नाही. याशिवाय, फ्रान्स आणि जर्मनी सारख्या शक्तिशाली युरोपीय देशांच्या नेत्यांचाही यादीत समावेश नाही. यामागचं कारण म्हणजे, ‘टाइम’च्या प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत केवळ अशाच नेत्यांना स्थान दिले जाते, जे अलिकडेच खूपच चर्चेत राहिलेले आहेत, ज्यांच्या कार्यामुळे समाजावर काही प्रभाव पडला आहे.