Worlds Most Polluted Capital: प्रदूषण वाढत आहे आणि प्रदूषण कमी करायला हवं या दोन गोष्टींवर सामान्यपणे सर्वांचंच एकमत होईल यात अजिबात शंका नाही. पण प्रदूषण कसं कमी करायचं आणि प्रदूषण कुणी कमी करायचं? यावर मात्र व्यापक मतभिन्नता आढळून येते. घराच्या बैठकीत प्रदूषण टाळायला हवं म्हणणारी मंडळी दारातून बाहेर पडताच प्रदूषणाला हातभार लावू लागतात. ही वृत्ती व्यक्तिगत पातळीपासून संघटना, संस्था, कंपन्या, राज्य, देश ते थेट जागतिक पातळीपर्यंत दिसून येते. याचाच परिणाम नुकत्याच जाहीर झालेल्या World Air Quality Report अर्थात जागतिक हवा गुणवत्ता अहवालात दिसून येत आहे.

दिल्ली सर्वात प्रदूषित राजधानी

२०२४ चा वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट जाहीर करण्यात आला असून यानुसार दिल्ली ही जगातील सर्व राजधान्यांपैकी सर्वात प्रदूषित राजधानी ठरली आहे. गेल्या सलग सहा वर्षांपासून दिल्ली अशाच प्रकारे सर्वाधिक प्रदूषित राजधानी ठरली आहे. त्याशिवाय, सर्वाधिक प्रदूषित २० शहरांमध्ये दिल्लीचा दुसरा क्रमांक लागतो.

महाराष्ट्रातील दोन शहरांचा समावेश

दरम्यान, सर्वाधिक २० प्रदूषित शहरांमध्ये महाराष्ट्रातील दोन शहरांचा समावेश आहे. यात आठव्या क्रमांकावर लोणी तर १७व्या क्रमांकावर भिवंडीचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असणारी मुंबई पहिल्या २० शहरांच्या यादीत नाही.

२० पैकी १३ शहरं भारतातील!

भारतासाठी चिंतेची बाब म्हणजे जगातल्या २० सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये एकट्या भारतातील १३ शहरांचा समावेश आहे. त्यात पहिल्या क्रमांकावर मेघालयमधील बिरनिहाट हे छोटं शहर पहिल्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ दिल्ली, मुल्लनपूर, फरीदाबाद, लोणी, नवी दिल्ली, गुरगाव, गंगानगर, ग्रेटर नोएडा, भिवंडी, मुझफ्फरनगर, हनुमानगढ आणि नोएडा या शहरांचा समावेश आहे.

इतर ७ शहरं कोणत्या देशांमधली?

भारतातील १३ शहरांव्यतिरिक्त २० सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये कारागंदा (कझाकिस्तान), लाहौर (पाकिस्तान), एनजामेन (चाड), मुलतान (पाकिस्तान), पेशावर (पाकिस्तान), सियालकोट (पाकिस्तान) आणि होतान (चीन) या शहरांचा समावेश आहे. उरलेल्या ७ शहरांमध्ये चार शहरं पाकिस्तानमधली आहेत.

भारतीयांचं सरासरी आयुष्य घटलं!

दरम्यान, भारतासाठी सर्वात चिंतेची बाब म्हणजे वाढत्या प्रदूषणामुळे भारतातील नागरिकांचं सरासरी आयुष्यमान हे ५.२ वर्षांनी घटल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. जगभरातील देशांच्या यादीत प्रदूषणाच्या बाबतीत भारत पाचव्या क्रमांकावर आहे. भारतातील प्रतीघनमीटर प्रदूषणाची पातळी ही जागतिक आरोग्य संघटनेच्या किमान मानकांपेक्षा तब्बल १० पट जास्त आहे. २०२३ साली भारताचा प्रदूषित देशांच्या यादीत तिसरा क्रमांक होता.

कसा तयार केला अहवाल?

जगभरातले १३८ देश, प्रांत किंवा प्रदेशांमधील ८ हजार ९५४ ठिकाणी बसवण्यात आलेल्या ४० हजार एअर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशनमध्ये नोंद झालेल्या माहितीच्या आधारावर हा अहवाल तयार करण्यात आला आहे. यापैकी १२६ देशांमध्ये अर्थात ९१.३ टक्के देशांमध्ये जागतिक आरोग्य संघटनेनं ठरवून दिलेल्या प्रदूषणाच्या पातळीपेक्षा जास्त प्रदूषण आढळून आलं आहे.

Story img Loader