वॉशिंग्टन : केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातील अनेक देशांमध्ये अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळयाचा आनंद साजरा करण्यात आला. विविध ठिकाणी प्रार्थना आणि इतर धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
न्यूयॉर्कमधील ‘टाइम्स् स्क्वेअर’ येथे प्राणप्रतिष्ठा सोहळयाचे थेट चित्रीकरण पाहण्यासाठी या शहरातील शेकडो भारतीय जमले होते. या ठिकाणी रोषणाई करण्यात आली होती. पारंपरिक पोशाख, नृत्य, भजने आणि इतर गाणी गाताना भारतीय दिसत होते. रविवारी झालेल्या या कार्यक्रमात २,५०० हून अधिक जण सहभागी झाले होते.
हेही वाचा >>> भाजपा महिला विरोधी; प्रभू रामाचा जयजयकार करताना सीता मातेचा विसर, ममता बॅनर्जींची टीका
लॉस एंजेलिस येथे कार रॅली आयोजित करण्यात आली होती, त्यात एक हजार जण सहभागी झाले होते. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानंतर वल्र्ड हिंदू कौन्सिल ऑफ अमेरिका (व्हीएचपीए) आणि कॅनडाच्या विश्व हिंदू परिषदेने दोन्ही देशांतील एक हजारांहून अधिक मंदिरांना भेट देण्यासाठी राम मंदिर यात्रेची घोषणा केली. त्रिनिदाद आणि टोबॅगो या कॅरिबियन देशातही विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात भारतीय वंशाचे हजारो नागरिक सहभागी झाले होते. या वेळी सांस्कृतिक कार्यक्रम आणि राम गीतांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
मॉरिशस सरकारने त्यांच्या देशातील हिंदू असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना प्रार्थनेला उपस्थित राहण्यासाठी दोन तासांची विशेष रजा मंजूर केली.
देशभर भक्तिमय वातावरण
अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळयानिमित्त देशभर भक्तिमय वातावरण होते. विविध मंदिरांमध्ये हवन तसेच धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अनेक राज्यांनी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती. सकाळपासून मंदिरांमध्ये पूजा, हवन करण्यात येत होते. घरासमोर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. केरळचे राज्यपाल अरिफ मोहम्मद खान यांनी तिरुअनंतपूरममधील रमादेवी मंदिरात पूजा केली. झारखंडमध्येही राज्यभरातील ५१ हजार मंदिरांवर रोषणाई करण्यात आली होती. १८ हजार ५०० चौरस फूट अशी महाकाय रांगोळी जमशेदपूर येथील श्री लक्ष्मी नारायण मंदिरात काढण्यात आली होती. केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांनी त्याचे उद्घाटन केले. विशाल मिश्रा या कलाकाराने दोन आठवडे परिश्रम करून ही रांगोळी साकारली आहे. पाटण्यातही विविध मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.