जी-२०, ‘ब्रिक्स’ परिषदेत पॅरिसवरील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध
पॅरिसमध्ये शुक्रवारी रात्री ‘आयसिस’ या दहशतवादी संघटनेने घडवलेल्या हल्ल्यांत १२९ जणांचा बळी गेल्यानंतर रविवारी तुर्कस्तानमधील अंताल्या येथे सुरू झालेल्या जी-२० संघटनेच्या परिषदेत जागतिक नेत्यांनी दहशतवादाविरुद्ध एकजुटीने लढण्याचा निर्धार व्यक्त केला. दहशतवादाचा सामना करण्यासाठी जगाने संघटित व्हावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले, तर आयसिसचे जाळेउद्ध्वस्त करण्यासाठी दुपटीने प्रयत्न करण्याचा निर्धार अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केला.
जी-२० परिषदेत सर्वसमावेशक आर्थिक विकास आणि हवामान बदलावर चर्चा होण्याची अपेक्षा होती. मात्र, पॅरिसवरील हल्ल्याने चर्चेचा केंद्रबिंदू दहशतवादाकडे वळवला. आयसिसच्या गळ्याभोवतालचा फास आवळण्यासाठी त्या संघटनेला मिळणारा निधी आणि खनिज तेलाच्या काळ्या व्यापारातून मिळणारा पैसा रोखण्यावर भर देण्यात येणार आहे. आयसिसचे आर्थिक स्रोत संपवण्यासाठी ‘फिनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स’ची तातडीने अंमलबजावणी करण्याचा मुद्दा संघटनेच्या घोषणापत्रात असण्याचे संकेत आहेत. त्यासह दहशतवाद्यांना विविध देशांच्या सीमा ओलांडून प्रवास करता येऊ नये म्हणून अधिक समन्वय साधून पाळत ठेवली जाणार आहे. दहशतवादी कृत्यांसाठी केला जाणारा तंत्रज्ञान, संचारसाधने आणि संसाधनांचा गैरवापर रोखण्यावरही भर राहील.
र्सवकष योजना..
अतिरेकी आणि दहशतवादाचा सामना करण्यासाठी लवकरच र्सवकष योजना संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला सादर करणार असल्याचे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की-मून यांनी सांगितले.
‘ब्रिक्स’ परिषदेतही दहशतवाद हाच मुद्दा..
अंताल्या येथेच जी-२० परिषदेबरोबरच ‘ब्रिक्स’ संघटनेची (ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) परिषदही झाली. त्यातही मोदींसह अन्य नेत्यांनी दहशतवादाचा एकजुटीने मुकाबला करण्याची गरज व्यक्त केली. दहशतवादाचा एकत्रित मुकाबला करण्यासाठी अमेरिका आणि रशिया यांच्यात सहकार्याची गरज असल्याचे मत युरोपीय परिषदेचे अध्यक्ष डोनाल्ड टस्क यांनी व्यक्त केले.
अमेरिका-रशिया एकत्र?
व्हिएन्ना : आयसिसने पॅरिस, बैरुत येथे केलेले हल्ले
आणि सिनाई द्विपकल्पात रशियाचे विमान पाडण्याच्या घटनांनंतर ‘आयसिस’ विरोधातील मोहिमेत अमेरिका आणि रशिया सहकार्य करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी आणि रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरॉव्ह यांनी ही शक्यता व्यक्त केली.