देशभरात मान्सून सक्रिय झाला असून, अनेक भागांत मुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पाऊस कोसळत आहे. तर दुसरीकडे विजा कोसळून अनेकांना जीव गमवावा लागल्याच्या घटनाही दोन तीन दिवसांत घडल्या आहेत. वीज पडतानाचा असाच एक व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला असून, हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गुजरातमधील द्वारकेत असलेल्या प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिराच्या ध्वजस्तंभवर वीज पडली. वीज पडतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. वीज पडल्याने मंदिराच्या ध्वजस्तंभाचं नुकसान झालं असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
जगप्रसिद्ध द्वारकाधीश मंदिरावर मंगळवारी वीज पडल्याची घटना घडली. वीज कोसळतानाचा व्हिडीओ समोर आला असून, तो व्हायरलही झाला आहे. मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. वीज पडल्याने मंदिराच्या ५२ फूट उंच ध्वजस्तंभाचं नुकसान झालं आहे. तर भिंती काळ्या पडल्या आहेत. मात्र, मंदिराचं कोणतंही नुकसान झालेलं नाही.
वीज पडल्याच्या घटनेनंतर द्वारकेचे उपजिल्हाधिकारी निहार भेटारिया यांनी घटनेनंतर लगेच मंदिराला भेट दिली आणि परिसराची पाहणी केली. वीज पडल्यामुळे मंदिराचं कोणतंही नुकसान झालेलं नाही. पाहणी करण्यात आल्यानंतर मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम संथगतीने सुरू करण्यात आले.
Thunderbolt Lightening at Dwarkadhish Temple in Dwarka, Gujarat . pic.twitter.com/CqUMsOKOcG
— Siddhu Manchikanti (@SiDManchikanti) July 13, 2021
द्वारकेत गोमती नदीच्या तिरावर द्वारकाधीश मंदिर उभारण्यात आलेलं असून, हे मंदिर तब्बल २२०० वर्ष जुनं आहे. या मंदिर परिसरात भगवान श्रीकृष्ण यांच्याबरोबरच सौभद्रा, बलराम, रेवती, वासुदेव, रुख्मिणी अनेक देवी देवतांचीही स्थापना करण्यात आलेली आहे. जन्माष्टमीच्या दिवशी द्वारकाधीश मंदिरात उत्साहाचं वातावरण असतं.
वीज पडल्याने उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये ४९ जणांचा मृत्यू
उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये रविवारी वेगवेगळ्या घटनांमध्ये वीज पडून तब्बल ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. वीज पडल्याने उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये ३० जणांना प्राण गमवावा लागला. यामध्ये प्रयागराजमध्ये १४, कानपूर देहातमध्ये पाच, तर कौशंबीमध्ये चार जणांचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणे फिरोझाबादमध्ये तीन आणि उन्नाव व चित्रकूटमध्ये प्रत्येक दोन जणांचा वीज पडल्याने मृत्यू झाला आहे. राजस्थानमध्येही वीज पडल्याने १९ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी ११ मृत्यू एकट्या जयपूरमध्ये झाले. राज्यातील वेगवगळ्या भागांमध्ये वीज पडल्याच्या घटनांमध्ये १७ जण जखमी झाले.