India in World Happiness Report 2025 : वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट २०२५ नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे. या रिपोर्टमध्ये जगभरातील सर्वात आनंदी देशांची यादी जाहीर करण्‍यात आली आहे. या यादीत पुन्हा एकदा जगातील सर्वात आनंदी देश म्हणून फिनलंड ठरला आहे. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट २०२५ नुसार फिनलंड आठव्यांदा जगातील सर्वात आनंदी देश ठरला आहे. फिनलंडचे लोक सर्वात आनंदी असण्यामागणी कारणे वेगवेगळी सांगण्यात आली आहेत. तेथील चांगली सामाजिक सुरक्षा, लोकांचा एकमेकांवर विश्वास आणि सरकार जनतेची घेत असलेली काळजी यासह अनेक कारणे सांगण्यात आली आहेत.

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या वेलबीइंग रिसर्च सेंटरने गॅलप, यूएन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्क आणि स्वतंत्र संपादकीय मंडळाच्या भागीदारीत हा अहवाल २० मार्च रोजी प्रकाशित केला. हा क्रम जाहीर करताना देशातील दरडोई उत्‍पन्‍न, सामाजिक आधार, निरोगी आयुर्मान, स्वातंत्र्य, उदारता आणि भ्रष्टाचार यासह आदी गोष्टीचा विचार करून देशाचा क्रम ठरवला जातो. या अहवालात सर्वात आनंदी आणि सर्वात कमी आनंदी देशांमधील तफावत अधोरेखित करण्यात येते. या यादीत अफगाणिस्तान सर्वात खालच्या स्थानावर आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

दरम्यान, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट २०२५ नुसार भारत १४७ देशांपैकी ११८ व्या क्रमांकावर आहे. तसेच फिनलंड पुन्हा एकदा सर्वात आनंदी देश ठरला आहे. फिनलंड या देशानंतर डेन्मार्क आणि आइसलँडचा क्रमांक लागतो. तसेच अफगाणिस्तान सर्वात खालच्या स्थानावर असून त्यानंतर सिएरा लिओन आणि लेबनॉनचा क्रमांक लागतो. २०१२ मध्ये भारताचा या यादीत सर्वात खालचा क्रमांक १४४ होता, तर २०२२ मध्ये ९४ वर पोहोचला.

कोणता देश कोणत्या क्रमांकावर?

तसेच भारताच्या शेजारील देशांमध्ये श्रीलंका १३३ व्या, बांगलादेश १३४ व्या, पाकिस्तान १०९ व्या, नेपाळ ९२ व्या आणि चीन ६८ व्या क्रमांकावर आहे, तर भारत ११८ व्या क्रमांकावर आहे. तसेच पश्चिमी देशांनी पहिल्या २० मध्ये विशेषतः युरोपीय देशांवर वर्चस्व गाजवलं आहे. कोस्टा रिका आणि मेक्सिको यांनी प्रथमच अनुक्रमे ६ व्या आणि १० व्या क्रमांकावर पहिल्या १० मध्ये प्रवेश केला आहे. तसेच अमेरिका २४ व्या क्रमांकावर आहे. युनायटेड किंग्डम देखील २३ व्या क्रमांकावर आहे.

जगातील सर्वात आनंदी २० देश कोणते?
वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट २०२५ च्या अहवालानुसार, फिनलंड, डेन्मार्क, आइसलँड, स्वीडन, नेदरलँड्स, कोस्टा रिका, नॉर्वे, इस्रायल, लक्झेंबर्ग, मेक्सिको, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, स्वित्झर्लंड, बेल्जियम, आयर्लंड, लिथुआनिया, ऑस्ट्रिया, कॅनडा, स्लोव्हेनिया, चेक प्रजासत्ताक या देशांचा क्रमांक जगातील सर्वात आनंदी असलेल्या पहिल्या २० देशात लागतो.

Story img Loader