देशाच्या आर्थिक धोरणांबाबत चर्चेसाठी पुढील आठवड्यात मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या जागतिक हिंदू इकॉनॉमिक फोरममध्ये (डब्ल्यूएचईएफ) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. देशात आर्थिक मंदीची स्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

२७ ते २९ सप्टेंबर या तीन दिवसांच्या काळात मुंबईत होणाऱ्या या परिषदेला उद्योग क्षेत्रातील मान्यवर लोक उपस्थित राहणार आहेत. यामध्ये पिरामल ग्रुपचे चेअरमन अजय पिरामल, लॉकहीड मार्टिन या एरोस्पेस आणि डिफेन्स कंपनीचे उपाध्यक्ष विवेक लाल, टाटा सनच्या इन्फ्रास्ट्रक्चर अँड डिफेन्स अँड एरोस्पेसचे अध्यक्ष बनमाली अगरवाल यांचा समावेश असणार आहे. हे लोक देशातील सध्याची बिकट आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी गुंतवणूक आणि निर्यात क्षेत्रांबाबत चर्चा करणार आहेत. हिंदुस्तान टाइम्सने याबाबत वृत्त दिले आहे.

“देशातील आर्थिक मंदीबाबत माध्यमांमधून विविध बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र, माझ्या दृष्टीकोनातून रिअर इस्टेट क्षेत्रासारख्या केवळ काही क्षेत्रांमध्येच अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली आहे. अनेक लोकांकडे अद्याप पैसा असून त्यांना तो गुंतवायचा आहे मात्र, मंदीबाबतच्या बातम्यांमुळे ते काळजीपूर्वक पावले उचलत आहेत,” असे वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरमचे सदस्य गुना मॅगेसन यांनी म्हटले आहे.

मॅगेसन म्हणाले, “बाजारात गुंतवणुकीच्या संधी तयार करण्याबाबत उपाययोजना करणे हे या परिषदेचे ध्येय आहे. १५ व्या शतकापर्यंत भारताचा जगाच्या जी़डीपीत ३५ टक्के वाटा होता, तो आता केवळ २ ते ३ टक्क्यांवर आला आहे. सध्या आपल्या आयातीवरील अवलंबित्वात वाढ झाली आहे. त्यामुळे पुन्हा जगाच्या जीडीपीत आपला वाटा वाढवण्यासाठी हा ट्रेन्ड उलटा करण्याची गरज आहे.”

वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरमच्या (डब्ल्यूएचईएफ) वेबसाईटनुसार, हिंदू समाजातील आर्थिकदृष्ट्या यशस्वी झालेल्या घटकांना एकत्र आणण्याच्या हेतूने या फोरमची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे हे घटक आपल्यामधील व्यावसायिक ज्ञान, कौशल्य आणि संसाधने आपल्या भाऊबंदांसाठी शेअर करतील. यामुळे त्यांच्या संपत्तीत वाढ होऊन समाजाची वृद्धी होईल हा याचा हेतू आहे.