Ukrainian incursion in Russia, World War III: दोन वर्षांपूर्वी रशियाने युक्रेनवर हल्ला चढवला होता. गेल्या दोन वर्षांपासून युक्रेनने रशियाला कडवी झुंज दिली. त्यानंतर आता पहिल्यांदाच युक्रेनने रशियाच्या कुर्स्क प्रदेशात शिरकाव केला आहे. ६ ऑगस्टपासून युक्रेनने आघाडी घेतली असून रशियन सैन्याला मागे सारले आहे. त्यामुळे रशियाला या भागातून दोन लाखांहून अधिक नागरिकांना बाहेर काढावे लागले आहे. यानंतर आता रशियाचे खासदार मिखाईल शेरेमेट यांनी जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचले असल्याचे मोठे विधान केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

युक्रेनने पाश्चिमात्य देशांच्या पाठिंब्यावर रशियात घुसखोरी केली असून यामुळे जगात आता तिसऱ्या महायुद्धाचा धोका निर्माण झाला आहे, असे विधान शेरेमेट यांनी केले. खासदार शेरेमेट हे रशियाच्या संरक्षण समितीचे सदस्य आहेत. युक्रेनला पाश्चिमात्य देशातील लष्कर आणि लष्करी उपकरणांची साथ मिळाली आहे. त्या मदतीवरच रशियाच्या मातीत पाऊल ठेवण्याचे धाडस त्यांनी ठेवले आहे. या कृतीमुळे आता जगावर नवे संकट ओढविण्याची शक्यता आहे, असे शेरेमेट म्हणाले.

हे वाचा >> युक्रेनचे सैन्य घुसले थेट रशियन हद्दीत! धाडसी कुर्स्क मोहिमेमुळे युद्धाचा रंग पालटणार?

विशेष म्हणजे आजच उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी रशियाला मदत देण्याचे पुन्हा एकदा आश्वासन दिले. शांतता आणि न्यायासाठी सुरू केलेल्या युद्धात रशियाला यश मिळेल, असा विश्वासही किम जोंग उन यांनी व्यक्त केला.

जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे

रशियातील आरआयए या वृत्तसंस्थेने मिखाईल शेरेमेट यांच्या वक्तव्याचे वृत्त दिले आहे. ते म्हणाले, “युक्रेनकडे पाश्चिमात्य देशातील शस्त्रास्त्र आहेत. त्याचा वापर रशियन भूमीत केला गेला आहे. नागरी पायाभूत सुविधांवर हल्ले चढवले गेले. पाश्चात्य देशांचे क्षेपणास्त्र रशियावर डागण्यात आले. रशियन भूमीवर केल्या गेलेल्या हल्ल्यात पाश्चात्य देशांचा सहभाग नाकारता येत नाही. त्यामुळे जग आता तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे, असा निष्कर्ष काढता येऊ शकतो.”

रशियाचा नाटो आणि पाश्चात्य गुप्तचर संस्थेवर आरोप

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांचे जवळचे सहकारी निकोलाई पात्रुशेव्ह यांनीही या परिस्थितीवर गंभीर चिंता व्यक्त केली. रशियातील एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते म्हटले की, युक्रेनच्या घुसखोरीमागे नाटो आणि पाश्चिमात्य देशातील गुप्तचर यंत्रणाचा हात आहे. त्यांच्या या दाव्याबाबत त्यांनी कोणताही पुरावा सादर केला नसला तरी पाश्चिमात्य देशांच्या हस्तक्षेपावर रशियाची नाराजी यातून स्पष्ट होत आहे.

कुर्स्क प्रदेशात युक्रेनची घुसखोरी

युक्रेनने रशियाच्या कुर्स्क प्रदेशात चढाई करून दुसर्‍या महायुद्धानंतरचा रशियन भूमीवरील सर्वात मोठा हल्ला केला आहे. युक्रेनच्या सैन्याने सुडझा नावाच्या शहरातील १,१५० चौरस किलोमीटरपेक्षा जास्त क्षेत्र आणि ८२ नागरी वसाहतींवर ताबा मिळविल्याचा दावा करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World is on the brink of a third world war russian mp issues a big threat over ukraine kvg