World Media On Manmohan Singh Death : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. जगातील सर्वोत्तम अर्थशास्त्रज्ञांपैकी एक मानले जाणारे मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशावर शोककळा पसरली आहे. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांसह जगभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. मनमोहन सिंग यांच्या निधनाची जगभरातील प्रसार माध्यमांनी दखल घेतली असून, “अनुत्सुक पंतप्रधान आणि भारतातील आर्थिक सुधारणांचे शिल्पकार” म्हणून त्यांचे वर्णन केले आहे.

‘मृदुभाषी’ आणि ‘प्रतिभावान’

अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्राने डॉ. मनमोहन सिंग यांचे, ‘मृदुभाषी’ आणि ‘प्रतिभावान’ असे वर्णन केले आहे. न्यूयॉर्क टाइम्सने त्यांच्या वृत्तात पुढे म्हटले आहे की, “माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यामुळे भारत चीनशी स्पर्धा करण्यास सक्षम आर्थिक शक्तीस्थान म्हणून उदयास आला.”

दुसरीकडे अमेरिकेची वृत्तसंस्था असलेल्या असोसिएटेड प्रेसने डॉ. मनमोहन सिंग यांंनी अर्थमंत्री असताना १९९१ मध्ये केलेल्या आर्थिक सुधारणांमुळे भारतावरीलसंभाव्य आर्थिक संकट कसे दूर झाले यावर प्रकाश टाकला आहे.

वॉशिंग्टन पोस्टने, डॉ. मनमोहन सिंग यांच्यामुळे गरिबीने ग्रासलेल्या देशाचे उगवत्या शक्तीमध्ये कसे रूपांतर झाले याबाबत लिहिले आहे. वॉशिंग्टन पोस्टने पुढे म्हटले आहे की, “अनेक भारतीय नेते भारी भारी कपडे आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये वारंवार जेवणासाठी कुप्रसिद्ध असताना, साध्या कपड्यांसह आणि जाड काळ्या शूजसह, ते काटकसरीचे जीवन जगले.”

हे ही वाचा : “डॉक्टर साहेब त्या Maruti 800 कडे पाहतच रहायचे”, मनमोहन सिंग यांचे सुरक्षा रक्षक राहिलेल्या मंत्र्याची भावूक पोस्ट

आर्थिक सुधारणांचे शिल्पकार

बीबीसीने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे आर्थिक सुधारणांचे शिल्पकार म्हणून वर्णन केले आहे. “डॉ. मनमोहन सिंग यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती महत्त्वाकांक्षी आणि अभूतपूर्व आर्थिक सुधारणांसाठी महत्त्वाची गोष्ट होती. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी कर कमी केले, रुपयाचे अवमूल्यन केले, सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण केले आणि परकीय गुंतवणूक वाढीला प्रोत्साहन दिले”, असेही बीबीसीने मनमोह सिंग यांच्या निधनाच्या वृत्तात म्हटले आहे.

अनुत्सुक पंतप्रधान

लंडनमधून प्रकाशित होणाऱ्या द गार्डियन वृत्तपत्राने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे अनुत्सुक पंतप्रधान म्हणून वर्णन केले आहे. मनमोहन सिंग यांच्या निधनाच्या वृत्तात द गार्डियनने म्हटले आहे की, “लाजाळूपणा आणि कायम पडद्यामागे राहण्याला प्राधान्य दिल्यामुळे ते भारताचे अनुत्सुक पंतप्रधान म्हणून ओळखले जातात.”

Live Updates
Story img Loader