पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) सह-अध्यक्ष आणि माजी राष्ट्रपती आसिफ अली जरदारी यांनी माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर टीकेचा भडीमार केला आहे. नवाज शरीफ यांच्यामुळेच जगभरात पाकिस्तानची खिल्ली उडवली जातेय असा आरोप जरदारी यांनी पाकिस्तानवर केला.
माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पाकिस्तानला अशा ठिकाणी आणून सोडलंय की जगभरात पाकिस्तानची खिल्ली उडवली जातेय, असं जरदारी म्हणाले. शरीफ सरकारने केलेल्या चुकीच्या कामांना सुधारण्याचं काम आमचं सरकार करेल, असा विश्वास जरदारी यांनी व्यक्त केलाय.
पाकिस्तानात २५ जुलै रोजी निवडणुका होणार आहेत, त्यामुळे येथील राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. २४ वर्षांनंतर जरदारी हे नवाबशाह या मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. या निवडणुकीत जरदारी यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टी, नवाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग आणि माजी क्रिकेटपटू इमरान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ यांच्यात त्रिशंकु लढाई पाहायला मिळणार आहे.