उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या २०२२ च्या पाचव्या टप्प्यासाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी भाजपाने पूर्ण जोर लावला आहे. दरम्यान, भाजपा खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी भाजपा उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी बलियाच्या बिलथरा रोड विधानसभा मतदारसंघात पोहोचल्या होत्या. जिथे त्यांनी आपल्या भाषणात रशिया-युक्रेनचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं.
जनतेला संबोधित करताना त्या म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात स्वत:साठी एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. ते जागतिक नेते म्हणून उदयास आले आहेत. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धावर हेमा मालिनी म्हणाल्या की, मोदीजींनी पुढे येऊन हे युद्ध थांबवावे अशी संपूर्ण जगाच्या नेत्यांची इच्छा आहे. सोशल मीडिया यूजर्सनी हेमा मालिनी यांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यास सुरुवात केली, तर काही लोकांनी यावर नाराजी व्यक्त करत प्रतिक्रिया दिल्या.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रात्री फोनवरुन रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी चर्चा केली. यावेळी पुतिन यांनी सध्या घडलेल्या घडामोडींबद्दल पंतप्रधान मोदींना सविस्तर माहिती दिली. तर दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी, ‘रशियाचे ‘नाटो’शी असलेले मतभेद चर्चेतूनच सोडविता येऊ शकतात,’ या भूमिकेचा पुनरूच्चार करून हिंसाचार थांबविण्याचे आवाहन पुतिन यांना केल्याचं मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय.