पौर्वात्य आणि पाश्चिमात्य जगाला आपल्या स्वर्गीय संगीताच्या सेतूने जोडणारे ख्यातनाम सतारवादक पंडित रविशंकर यांचे बुधवारी अमेरिकेतील रुग्णालयात वद्धापकाळ तसेच आजारपणाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. या अवलिया कलावंताने भारतीय शास्त्रीय संगीताची पताका पाश्चिमात्य जगात डौलाने फडकाविली होती.
पंडितजींच्या संगीत कारर्किदीचा गौरव १९९९ मध्ये ‘भारतरत्न’ या भारतातील सर्वोच्च नागरी किताबाने करण्यात आला होता. त्यांच्या मागे त्यांची पत्नी सुकन्या, नोरा जोन्स तसेच अनुष्का शंकर या दोन मुली, तीन नातू, चार पणतू असा परिवार आहे.
गेली काही वर्षे रविशंकर आजारपणामुळे त्रस्त होते. गेल्या गुरुवारी त्यांच्यावर कॅलिफोर्नियातील स्क्रीप्स मेमोरियल हॉस्पिटलमध्ये हृदयाची झडप बदलण्याची शस्त्रक्रिया झाली होती. शस्त्रक्रिया यशस्वी झाली. पण, तिचा ताण ते सहन करू शकले नाहीत. याच रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या आठवडय़ात त्यांना श्वासोच्छ्श्वासाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पंडित रविशंकर यांचे निधन झाले असल्याचे अत्यंत जड अंत:करणाने आम्ही कळवित आहोत, असे पत्नी सुकन्या व मुलगी अनुष्का शंकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. रविशंकर फाऊंडेशन आणि ईस्ट मिट वेस्ट या संस्थांनीही पंडितजींच्या निधनाबद्दल निवेदनाद्वारे शोक व्यक्त केला आहे.
प्रतिष्ठेचा ‘ग्रामी’ पुरस्कार पंडितजींनी तीनदा पटकावला होता. पहिला ग्रामी पुरस्कार त्यांना १९६७ मध्ये त्यांच्या ‘वेस्ट मीटस ईस्ट’ या अल्बमसाठी मिळाला होता. ‘द लिव्हिंग रुम सेशन्स पार्ट-१’ या अल्बमसाठी २०१३ या वर्षांसाठीच्या ग्रामी पुरस्कारासाठी त्यांचे नाव सुचविण्यात आले आहे. उल्लेखनीय म्हणजे त्यांची कन्या अनुष्का हिचे नावदेखील या पुरस्कारासाठी निर्देशित करण्यात आले आहे. पंडितजींची दुसरी मुलगी नोरा जोन्स हिने याआधीच या पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे.    

पं. रविशंकरजी हे महान आणि बुद्धिमान कलाकार होते. सतारवादनामध्ये ते जेव्हा आलाप सादर करायचे, तेव्हा ते रागाशी संवाद साधत आहेत, असेच वाटायचे. ही अनुभूती रसिकांनी अनेकदा घेतली आहे. भारतीय कलाकारांची त्यांनी जगाला ओळख करून दिली. कित्येक कलाकारांना त्यांनी कला सादरीकरणासाठी जगाचे दर्शन घडविले. हे कलाकार जगाला माहीत झाले,  हा गुण त्यांच्यातील महानता अधोरेखित करणारा आहे.                         – पं. जसराज           

Story img Loader