Worlds Most Dangerous Countries : जगातील सर्वात सुरक्षित देशांच्या यादीत अमेरिका ८९ व्या स्थानावर आहे. जागतिक महासत्ता असलेल्या आणि उद्योगासह शिक्षणासाठी जगभरातील लोकांची सर्वाधिक पसंती असलेल्या या देशाचा सुरक्षिततेच्या बाबतीत इतका खालचा क्रमांक पाहून अनेकांना धक्का बसू शकतो. विशेष म्हणजे भारत व पाकिस्तान हे देश सुरक्षिततेच्या बाबतीत अमेरिकेच्या पुढे आहेत. जगातील सर्वात सुरक्षित देशांच्या यादीत पाकिस्तानचा ६५ वा आणि भराताचा ६६ वा क्रमांक आहे.

अ‍ॅण्डोरा हा दक्षिण युरोपातील छोटासा देश जगातील सर्वात सुरक्षित देश असल्याचं नुम्बेओच्या सेफ्टी इंडेक्समध्ये म्हटलं आहे. कुठेही फिरायला जाताना, जगभर भ्रमंती करताना वैयक्तिक सुरक्षेला प्राधान्य देणाऱ्या लोकांसाठी हा देश सर्वोत्तम आहे. अ‍ॅण्डोराच्या एका बाजूला फ्रान्स तर दुसऱ्या बाजूला स्पेन हे दोन देश आहेत. हा एक भूपरिवेष्टित देश आहे.

सर्वेक्षण कोणी केलं? सर्वेक्षणाचे निकष काय?

नुम्बेओने २०२५ मधील राष्ट्रनिहाय सुरक्षा निर्देशांक व त्यानुसार गोळा केलेली माहिती सादर केली आहे. यासाठी त्यांनी त्यांच्या वेबसाइटला भेट देणाऱ्यांचं सर्वेक्षण केलं होतं. त्यानुसार १४६ देशांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. एखाद्या देशात दिवसा व रात्री फिरताना किती सुरक्षित वाटतं? विविध देशांमधील गुन्हेगारी, लुटमार, दरोडे, कार चोरी, अनोळखी व्यक्तींकडून होणारे हल्ले, सार्वजनिक ठिकाणी होणारा छळ, त्वचेच्या रंगावरून होणारा भेदभाव, वांशिक भेदभाव, लिंग व धर्माच्या आधारे केला जाणारा भेदभाव, त्यातून निर्माण होणारे गुन्हे या गोष्टी विचारात घेऊन हे सर्वेक्षण सादर करण्यात आलं आहे.

नुम्बेओने त्यांच्या वापरकर्त्यांनी दिलेली माहिती, सर्वेक्षणात दिलेली उत्तरे, शेअर केलेले अनुभव व डेटाच्या आधारावर सुरक्षित देशांची व असुरक्षित देशांची यादी सादर केली आहे. नुम्बेओ हा एक असा मंच आहे जो जगभरातील विविध देश व शहरांमधील लोकांचे राहणीमान खर्चाशी संबंधित माहिती गोळा करण्याचं व सर्वेक्षण करण्याचं काम करतो

सर्वात सुरक्षित १० देश

  1. अ‍ॅण्डोरा
  2. युनायटेड अरब अमिराती
  3. कतार
  4. तैवान
  5. ओमान
  6. आइल ऑफ मॅन
  7. हॉन्ग कॉन्ग
  8. अर्मेनिया
  9. सिंगापोर
  10. जपान

सर्वात असुरक्षित १० देश

  1. व्हेनेझुएला
  2. पपुआ न्यू गिनी
  3. हेटी
  4. अफगाणिस्तान
  5. दक्षिण आफ्रिका
  6. हॉन्डुरस
  7. त्रिनिदाद आणि टोबॅगो
  8. सीरिया
  9. जमैका
  10. पेरू