दोन हजार २९८ किमीचे अंतर अवघ्या आठ तासांत
राजधानी बिजिंग ते दक्षिणेकडील गुआंगझोऊ शहराला जोडणाऱ्या जगातील सर्वाधिक लांब पल्ल्याच्या बुलेट ट्रेनचे चीनने बुधवारी उद्घाटन केले. ताशी ३०० किमी वेगाने धावणारी ही बुलेट ट्रेन बिजिंग ते गुआंगझोऊ दरम्यानचे दोन हजार २९८ किमीचे अंतर अवघ्या आठ तासांत पार करणार आहे.
फायदा काय?
बिजिंग ते गुआंगझोऊदरम्यानचे अंतर कापण्यासाठी यापूर्वी २० तास लागत होते. मात्र आज सुरू झालेल्या अतिवेगवान बुलेट ट्रेनमुळे हे अंतर अवघ्या आठ तासांत पार करता येणार असून १२ तास वाचणार आहेत. या नव्या रेल्वेमार्गामुळे चीनमधील हायस्पीड रेल्वेचे जाळे आता ९ हजार ३०० किमी इतके झाले आहे. गेल्या वर्षी चीनने बिजिंग-शांघायदरम्यान १३०० किमी अंतराचा हायस्पीड रेल्वे मार्ग उभारला होता. या हायस्पीड रेल्वे मार्गामुळे या दोन शहरांमधील अंतर अवघ्या पाच तासांत पार करणे शक्य झाले आहे. मात्र आता नव्याने सुरू झालेला बििजग ते गुआंगझोऊ हा मार्ग चीनमधीलच नव्हे तर जगातील सर्वाधिक लांबीचा हायस्पीड रेल्वेमार्ग ठरला आहे. या रेल्वेमार्गामुळे बिजिंग शहर देशातील गुआंगडोंग प्रांतातील इतर औद्योगिक शहरांशी जोडले गेले आहे. हा हायस्पीड रेल्वेमार्ग २०१५ पर्यंत थेट हाँगकाँगपर्यंत जोडला जाणार आहे.
बेस्ट ३
फ्रान्सची टीजीव्ही
फ्रान्समधील टीजीव्ही ही ३०० कि.मी लांबीचा पल्ला गाठणारी बुलेट ट्रेन. यात पहिल्या वर्गासाठी खास वायफाय सु्विधा उपलब्ध करून दिल्या जातात. फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड या तीन देशांत ती वापरली जाते.
जर्मनीची आयसीई
ताशी ३०० कि.मी वेगाने धावणारी ही बुलेट ट्रेन टीजीव्हीची युरोपातील स्पर्धक म्हणून ओळखली जाते. याच कंपनीने चीनला बुलेट ट्रेनचे तंत्र विकले आहे.
जपानची शिनाकनसेन
३५० कि.मी अंतर दोन तासांत पार पाडणारी जपानची ही ट्रेन २५० कि.मी वेगाने धावणारी व मोठय़ा प्रमाणावर प्रवाशांची ने आण करणारी म्हणून ओळखली जाते.
सुविधा काय?
ताशी ३५० किमी वेगाने धावू शकेल अशा या हायस्पीड बुलेट ट्रेनला देशातील पाच प्रांतांमधील ३५ मोठय़ा शहरांमध्ये थांबे देण्यात आलेले आहेत. रेल्वे मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी झाओ चूनलेई यांनी सांगितले की, या हायस्पीड गाडीच्या तिकिटाचा दर प्रवाशांना हव्या असलेल्या सोयीसुविधांनुसार असणार आहे.