Worlds Most Powerful Passports 2025 Check List : जगातील सर्वात शक्तीशाली पासपोर्टच्या क्रमवारीत भारताची ५ अंकांनी घसरण झाली आहे. हेन्ली पासपोर्ट इंडेक्स २०२५ नुसार भारताची रँकिंग ही ८५ व्या क्रमांकावरून ८० गेली आहे. हेन्ली पासपोर्ट इंडेक्समध्ये १९९ देशांच्या पासपोर्ट्सना ते व्हिसा शिवाय किती देशांना भेटी देऊ शकतात यानुसार ही रँकिंग दिली जाते. नुकतेच जाहीर करण्यात आलेल्या या रँकिंगनुसार, भारतीय पासपोर्ट असणारे प्रवासी ५७ देशांना व्हिसाशिवाय भेट देऊ शकतात. भारताबरोबर या क्रमांकावर इक्वेटोरीयल गिनी आणि नाजर हे देश देखील आहेत.
पहिल्या क्रमांकावर कोण?
सर्वात शक्तिशाली पासपोर्ट म्हणून या यादीत सिंगापूरचा दबदबा कायम राहिला आहे. सिंगापूरने २०२५च्या यादीत पहिले स्थान पटकवले आहे. हेन्ली पासपोर्ट इंडेक्सनुसार सिंगापूरचा पासपोर्ट असलेली व्यक्ती जगभरातील १९५ देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करू शकते.
त्यापाठोपाठ जपान (१९३ देश), फिनलँड (१९२ देश), फ्रान्स (१९२ देश), जर्मनी (१९२ देश), इटली (१९२ देश), दक्षिण कोरिया (१९२ देश), स्पेन (१९२ देश), ऑस्ट्रिया (१९२ देश) आणि डेन्मार्क (१९१ देश) यांचा क्रमांक लागतो.
या निर्देशांकात यूएई (UAE) ने गेल्या दशकभरात सर्वात मोठी झेप घेतली आहे. २०१५ च्या तुलनेत यूएईचा पासपोर्ट असणार्यांना अधिकच्या ७२ देशामध्ये व्हिसाशिवाय प्रवेश मिळतो. यूएई पासपोर्ट धारकांना जगभरातील १८५ देशांमध्ये व्हिसा फ्री प्रवेश मिळतो. यूएई या निर्देशांकात ३२ स्थानांची उडी घेत १०व्या क्रमांकावर पोहचला आहे. अमेरिकेची मात्र या निर्देशांकात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. २०१५ आणि २०२५ दरम्यान यूएस दुसऱ्या स्थानावरून ९व्या स्थानावर घसरले आहे.
तळाशी कोण आहे?
२०२५ मध्ये, पाकिस्तान आणि येमेन हे दोन देश हेनली पासपोर्ट निर्देशांकात १०३ व्या स्थानावर आहेत , या दोन देशांचा पासपोर्ट असणाऱ्या नागरिकांना फक्त ३३ देशआंमध्ये व्हिसा शिवाय प्रवेश मिळतो. त्यानंतर इराक (३१ देश), सीरिया (२७ देश) आणि अफगाणिस्तान (२६ देश) यांचा क्रमांक लागतो.