जगातील सर्वात वयोवृद्ध असलेले जपानचे मसाझो नोनाका यांचे निधन झाले आहे. वयाच्या ११३ व्या वर्षी राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. जपानमधील ओशोरे येथे ते राहात होते. नोनाका यांचा जन्म २५ जुलै १९०५ मध्ये झाला होता.
१० एप्रिल २०१८ रोजी मसाझो यांनी आपल्या वयाची ११२ वर्षे आणि २५९ दिवस पूर्ण केले आणि त्यांना जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती असल्याचं प्रमाणपत्र गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने दिलं होते. जपानच्या उत्तरेकडील होकायडो बेटावर नोनाका कुटुंबियासोबत वास्तव्यास होते. मसाझो यांची सात भावंडे, पत्नी आणि पाचपैकी चार मुलांचंही वृद्धापकाळाने यापूर्वीच निधन झालं आहे. मसाझो यांना रविवारी झोपेतच नैसर्गिक मृत्यू आला. वयाच्या ११३ व्या वर्षीही मसाझो गोडं पदार्थ खात होते. त्यांच्या दीर्घायुष्याचं रहस्यदेखील गोड खाणं असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
जपान हा देश दीर्घायुषी लोकांसाठी प्रसिद्ध असून तेथील जेरोमॉन किमोरा यांचे २०१३ मध्ये वयाच्या ११६ व्या वर्षी निधन झाले होते. जपानमध्ये शंभरी ओलांडलेले किमान ६८,००० लोक आहेत, असे सरकारी आकडेवारीतून दिसून आले आहे.