नेपाळ येथे लुंबिनी येथे असलेल्या भगवान गौतम बुद्धांच्या जन्मस्थानी पुरातत्त्व शास्त्रज्ञांना उत्खननात विटांनी बांधलेल्या मंदिराच्या खाली लाकडी गाभारा सापडला आहे. त्यामुळे भगवान गौतम बुद्ध हे तेथे, आपण मानत होतो त्याच्या दोन शतके आधीपासून म्हणजे ख्रि.पू. सहाव्या शतकात राहत होते, असे आढळून आले आहे. नेपाळमधील लुंबिनी हे युनेस्कोने जागतिक वारसा जाहीर केले असून ते गौतम बुद्धांचे जन्मस्थान आहे.
 बुद्धाच्या जीवनाशी निगडित असा पहिलाच पुरातत्त्वीय पुरावा या उत्खननात सापडला आहे. बौद्ध धर्माविषयी त्यामुळे आणखी ऐतिहासिक माहिती मिळाली आहे, असे ब्रिटनमधील डय़ुरॅम विद्यापीठातील रॉबिन कॉनिंगहॅम यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. लाकडी रचना ही अशी आहे ज्यात मध्ये मोकळी जागा आहे. बुद्धाची आई मायादेवी यांनी तिथेच बुद्धाला जन्म दिला. तिथे एक झाडही होते. बुद्धांनी त्यांचे मूळ ठिकाण कोणते होते याविषयी जी गोष्ट सांगितली होती त्याच्याशी हे पुरावे जुळणारे आहेत, असे संशोधकांनी म्हटले आहे. खुल्या जागेत मध्यभागी सापडलेला लाकडी गाभारा हा त्या झाडाशी निगडित असावा. भूपुरातत्त्वशास्त्रीय संशोधनानुसार असे स्पष्ट झाले आहे की, मंदिराच्या मध्यभागी असलेल्या पोकळीत पुरातन झाडाची मुळे असल्याचे निश्चित झाले आहे. अँटिक्विटी या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. आतापर्यंत लुंबिनीत सापडलेली बौद्ध धर्मगृहे किंवा इतर बाबी या ख्रि.पू. तिसऱ्या शतकापूर्वीपलीकडच्या नव्हत्या. ख्रि.पू. तिसऱ्या शतकात सम्राट अशोकाने बौद्धधर्माचा अफगाणिस्तान ते बांगलादेश या भागात प्रसार केला होता.
डय़ुरहॅम विद्यापीठातील प्रमुख संशोधक कॉनिंगहॅम यांनी सांगितले की, गौतम बुद्धांच्या जीवनाविषयी आपल्याला लेखी स्रोत व मौखिक परंपरा यांपेक्षा जास्त काही माहिती नव्हते. काही विद्वानांच्या मते बुद्धांचा जन्म हा ख्रि.पू. तिसऱ्या शतकात झाला होता.
बुद्धाच्या जन्मतारखेविषयी वाद आहेत. अनेक विद्वानांच्या मते बुद्ध हे ख्रि.पू. चौथ्या शतकापासून येथे राहत होते व वयाच्या ८० व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला होता. आता प्रथमच आपल्याला लुंबिनी येथे पुरातत्त्वशास्त्रीय संदर्भ मिळाले आहेत. त्यानुसार ख्रि.पू. सहाव्या शतकातील लाकडी इमारतीचा दुवा आहे. कॉनिंगहॅम यांनी नेपाळमधील पशुपती विकास विश्वस्त संस्थेचे कोशप्रसाद आचार्य यांच्यासमवेत काम केले व आंतरराष्ट्रीय पुरातत्त्वशास्त्रज्ञाचे पथकही सोबत होते. लाकडी गाभाऱ्याचा कालावधी व त्याखालील आतापर्यंत माहिती नसलेल्या विटांच्या इमारती यांचा कालावधी ठरवण्यासाठी वाळूचे कण व लोणारी कोळसा यांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यासाठी रेडिओ कार्बन व प्रकाशदीप्ती तंत्रांचा वापर करण्यात आला. या संशोधनामुळे बौद्धधर्माचा उदय व प्रसार तसेच लुंबिनीचे आध्यात्मिक महत्त्व यावर प्रकाश पडला आहे, असे संशोधकांचे मत आहे.
नेपाळचे संस्कृतीमंत्री रामकुमार श्रेष्ठ यांनी सांगितले की, बुद्धाचे नेमके जन्मस्थान कोणते यावर आता अधिक स्पष्ट माहिती मिळाली आहे, या ठिकाणाच्या संवर्धनासाठी सरकार प्रयत्न करील. मध्ययुगीन काळात जंगलात लुप्त झालेल्या प्राचीन लुंबिनी येथे १८९६ मध्ये लुंबिनीचा नव्याने शोध लागला. ते बुद्धाचे जन्मस्थान असल्याचे सांगण्यात आले. ख्रि.पू. तिसऱ्या शतकातील वालुकाश्म दगडाच्या खांबामुळे तिथे हे बुद्धांचे अस्तित्व होते असे सांगितले जाते. गौतम बुद्ध हे सिद्धार्थ गौतम किंवा बुद्ध म्हणून प्रसिद्ध होते व त्यांनीच बौद्धधर्माचा प्रसार केला. वयाच्या २९ व्या वर्षी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा