शुक्रवारी (२१ जून) जगभरात पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जाणार आहे. जगभरातून योग दिवस साजरा करण्याची तयारी सुरू आहे. या दिवसाचे औचित्य साधत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात कमी उंचीची नोंद असलेल्या ज्योती आमगे यांनी योगासनं केली आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेनं ज्योती आमगे यांचा योगासनं करतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

ज्येती आमगे यांनी नागपूरमधील एका पार्कमध्ये योग ट्रेनरसोबत योगासनं केली. विविध योग आसने ज्येती यांनी अतिशय सहजतेनी केली. २५ वर्षीय आमगे यांनी सर्वात कमी उंची असल्याने गिनिज बुक रेकॉर्ड केले आहे. ज्योती आमगे योगासनं करताना पार्कमध्ये गर्दी जमली होती. पार्कमधील लोकही ज्योती यांच्यासोबत योगासनं करण्यात दंग झाली होती.

कमी उंचीमुळे ज्योतीचे आयुष्य हे सर्वसाधारण व्यक्तीसारखे नाही. तिला सोफ्यावरसुद्धा स्वत:हून बसता येत नाही. कुठेही बाहेर जायचे असेल तर तिला कडेवर घेण्याशिवाय पर्याय नसतो. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी आली असता ती स्वत: मतदान केंद्रावर कुणाचाही आधार न घेता चालत आली होती. ज्योती आज २५ वषार्ंची असून परिवारातील सदस्य तिला बाळासारखे जपत आहेत.