जगभरात करोना संसर्ग असलेल्या रुग्णांची संख्या आता १० लाख झाली असून मृतांची संख्या पन्नास हजारांवर गेली आहे. निम्म्या पृथ्वीवर निर्बंध लागू असूनही करोनाचा प्रसार कमी होताना दिसत नाही.
अमेरिका, स्पेन, ब्रिटन या देशात अजून करोना साथीची परमोच्च अवस्था अजून गाठायची आहे. इटलीत ११ हजारांहून अधिक बळी गेले आहेत. करोनाच्या साथीची मोठी आर्थिक किंमत जगाने मोजली असून ६.६५ दशलक्ष अमेरिकी लोकांनी बेरोजगारी भत्त्यासाठी अर्ज केले आहेत. अमेरिकेत १ कोटी लोकांचे रोजगार गेले आहेत. अर्थतज्ज्ञांच्या मते परिस्थिती आणखी वाईट होणार आहे.
पॅन्थियॉन मॅक्रोइकॉनॉमिक्स संस्थेचे आयन शेफर्डसन यांनी म्हटले आहे की, सध्याची परिस्थिती वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे आहेत. एप्रिलपर्यंत १.६० ते २ कोटी लोकांच्या नोक ऱ्या जाणार असून बेरोजगारी १३ ते १६ टक्के वाढणार आहे.
एका महिन्यात फिचने अमेरिका व युरोझोनमधील अर्थव्यवस्थांचे मूल्यांकन घटवले असून आताच्या तिमाहीत अर्थव्यवस्था ३० टक्के आक्रसणार असल्याचे म्हटले आहे. आशियन विकास बँकेने शुक्रवारी जागतिक अर्थव्यवस्थेला ४.१ लाख कोटी डॉलर्सचा फटका बसणार असल्याचे जाहीर केले आहे.
जागतिक बँकेने १६० अब्ज डॉलर्सची मदत विविध देशांना १५ महिन्यांत देण्याचे ठरवले असून भारताला एक अब्ज डॉलर्स दिले जाणार आहेत. अमेरिकेत आतापर्यंत ६ हजार बळी गेले असून काल एका दिवसात ११०० बळी गेले. व्हाइट हाउसने दिलेल्या अंदाजानुसार अमेरिकेत १ लाख ते २ लाख २४० हजार बळी जातील. अमेरिकी लष्करास १ लाख शवपेटय़ा तयार ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
अमेरिकेतील ८५ टक्के लोक घरातच असून न्यूयॉर्कमध्ये महापौर बिल द ब्लासियो यांनी लोकांना सार्वजनिक ठिकाणी जाताना तोंड झाकण्यास सांगितले आहे. स्पेन व ब्रिटनमध्ये गेल्या २४ तासांत अनुक्रमे ९५० व ५६९ बळी गेले असून आता मृतांच्या आकडेवारीचा आलेख स्थिर झाल्याचे स्पेनचे आरोग्य मंत्री साल्वादोर इलिया यांनी म्हटले आहे. करोनाचा संसर्ग केवळ वृद्ध लोकांना जास्त संख्येने होतो हा समज खोटा असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे हॅन्स क्लुग यांनी म्हटले आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पुढील काही आठवडय़ात दिवसाला १ लाख चाचण्या करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. रशियात एप्रिलअखेरीपर्यंत लोकांना वेतन दिले जाणार आहे. तेथे ३५०० रुग्ण सापडले आहेत.
रशियातील लोक टाळेबंदीत असून थायलंडमध्ये कडक निर्बंध लागू केले आहेत. ईशान्य नायजेरियात १८ लाख लोक बोको हराममुळे निर्वासित असून त्यांच्यात विषाणू वेगाने फैलावण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.