बलात्काराच्या वाढत्या घटनांमुळे उत्तर प्रदेशात सत्तेवर असणाऱ्या समाजवादी पक्ष आणि मुलायमसिंह यादव यांच्यावर टीका होत असली तरी या पक्षातील नेत्यांच्या वर्तनात कोणताही फरक पडलेला नाही. काही दिवसांपूर्वी उत्तरप्रदेशातील बदाऊन जिल्ह्यातील बलात्काराच्या घटनेनंतर राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी लोकांना गुगलवर जाऊन उत्तरप्रदेश आणि इतर राज्यातील बलात्काराच्या संख्येची तुलना करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे देशातील जनतेला खरी परिस्थिती समजण्यास मदत होईल, असा दावा अखिलेश यांनी केला होता. तर दुसरीकडे समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांच्यासमोर पत्रकारांनी बदाऊन जिल्ह्यातील बलात्काराच्या घटनेचा मुद्दा उपस्थित केला असता, ज्यांना उत्तर प्रदेशातील वाढत्या बलात्काराच्या घटनांची चिंता वाटत असेल, त्यांनी दिल्लीतच रहावे असे सांगितले. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत उत्तर प्रदेशातील गुन्हेगारी घटनांना प्रसारमध्यमांकडून अधिक प्रसिद्धी दिली जाते, असा आरोपसुद्धा यावेळी मुलायमसिंहांनी केला. दरम्यान, मुलायमसिंह यादव यांच्या स्नुषा डिंपल यादव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्यातील अशा प्रकारच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी सरकारने गंभीररित्या प्रयत्न करत असल्याचे सांगितले.