Worst Food in World : भारतातील ज्या-त्या राज्यातील भाषा आणि तेथील खाद्यपदार्थांमध्ये विविधता आढळून येते. त्यामध्ये प्रत्येक राज्यात खास पदार्थाची एक वेगळी ओळख बनलेली असते. खरं तर वेगवेगळ्या ठिकाणी पदार्थांची वेगळी खासियत पाहायला मिळते. मात्र, आता ‘टेस्टअटलास’ने जगभरातील सर्वात वाईट खाद्यपदार्थांची यादी प्रसिद्ध केली आहे. जगातील सर्वात वाईट पदार्थांच्या यादीत भारतातील मिस्सी रोटीचा (Missi Roti) समावेश करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतातील अनेक भागांमध्ये मिस्सी रोटी (Missi Roti) खूप लोकांना आवडते. तसेच मिस्सी रोटी ही पौष्टिकतेच्या दृष्टीनेही महत्वाची आहे आणि सुपरफूड मानली जाते. मात्र, ‘टेस्टअटलास’ने प्रसिद्ध केलेल्या ‘वर्ल्ड्स वर्स्ट डिशेस’च्या यादीत मिस्सी रोटीचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. तसेच अनेकजण सोशल मीडियावर आश्चर्य व्यक्त करत आहेत. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

दरम्यान, जगभरातील सर्वात वाईट खाद्यपदार्थांच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत १०० सर्वात वाईट (World Worst Food) पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये मिस्सी रोटीला ५६ वं स्थान देण्यात आलं आहे. या यादीत भारतातील मिस्सी रोटी या एकमेव डिशचा समावेश करण्यात आला आहे. पंजाबची पारंपारिक मिस्सी रोटी ही बेसन, मसाले आणि भाज्यांपासून तयार केली जाते, उत्तर भारतीय खाद्यपदार्थांसह मिस्सी रोटी मोठ्या उत्साहाने खाल्ली जाते. टेस्ट ॲटलसच्या या यादीत मिस्सी रोटीबरोबर जेली इल्स, फ्रॉग आय सॅलड अशा विविध पदार्थांचा या यादीत समावेश करण्यात आलेला आहे.

सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया उमटल्या?

जगातील सर्वात वाईट पदार्थांच्या यादीत भारतातील मिस्सी रोटीचा समावेश करण्यात आल्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी ‘टेस्टअटलास’ने प्रसिद्ध केलेल्या या यादीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. काहींनी म्हटलं की प्रत्येकाची चव वेगवेगळी असते. मात्र, या यादीत मिस्सी रोटी (Missi Roti) सारख्या पदार्थाचा समावेश करणे योग्य नाही, तर काहींनी या यादीला पक्षपाती यादी असल्याचं म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Worst food in world news tasteatlas top worst food in world list announced including missi roti in india gkt