दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांच्या अटकेनंतर हिंसाचार उफाळून आला आहे. त्यांच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरुन हिंसक आंदोलन सुरु केलं आहे. भ्रष्टाचार प्रकरणातील एका तपासात सहभागी न झाल्याने झुमांना १५ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. आपल्या कार्यकाळात झालेल्या भ्रष्टाचाराविषयीच्या तपासात पुरावे देण्याची सूचना देण्यात आली होती. मात्र त्यांनी या आदेशाला केराची टोपली दाखवल्याने त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यानंतर गेल्या आठवड्यात त्यांना अटक करण्यात आली आहे.

झुमा यांना अटक होऊ नये यासाठी त्यांच्या समर्थकांनी त्याच्या घराबाहेर गर्दी केली होती. ४ जुलैला झुमा यांनी शरण येणार नसल्याचं सांगितलं होतं. मात्र कोर्टाचा अनादर केल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी हिंसक आंदोलन सुरु केलं आहे. ठिकठिकाणी त्यांच्या समर्थकांचा उद्रेक पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी पोलीस आणि समर्थकांमध्ये हाणामारी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. दुकानांना आग लावणे, तसेच लुटमारीचे प्रकारही समोर आले आहेत. करोना काळात वाढलेली गरीबी आणि आर्थिक निर्बंधामुळे आधीच देशात अशांततेचं वातावरण आहे. त्यात झुमा यांच्या अटकेनंतर भर पडली आहे. वाढत्या हिंसाचारामुळे दुकानं, पेट्रोल पंप आणि सरकारी इमारती बंद करण्यात आलीत. हिंसाचारात आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आतापर्यंत ७५७ जणांना अटक करण्यात आली आहे.

“आम्ही लोकाना कोणत्याही प्रकारची हिंसा करू देणार नाही. कायदा हातात घेण्याऱ्या लोकांना शिक्षा केली जाईल. हिंसक आंदोलनं खपवून घेतली जाणार नाही”, असं गृहमंत्री भीकी सेले यांनी सांगितलं.

Story img Loader