उत्तर प्रदेशातील ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेची समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंग यांनी गंभीर दखल घेतली. आपण जर मुख्यमंत्री असतो तर केवळ १५ दिवसांत कायदा सुव्यवस्था सुरळीत केली असती, असे सुनावत मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी दोषी अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करून त्यांना तुरुंगात टाकण्यास कचरू नये, अशी सूचनाही मंगळवारी केली.
मी जर अखिलेशच्या जागी असतो तर अवघ्या १५ दिवसांत ढासळलेली कायदा सुव्यवस्था मूळ पदावर आणली असती, असे मुलायम सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
जिल्हा अधिकारी तसेच पोलीस अधीक्षकांवर कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याची जबाबदारी असते. त्यामुळे जर कोणी कायद्याची योग्य अंमलबजावणी करीत नसेल वा आदेशांचे पालन करीत नसेल तर अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांना तुरुंगात टाकावे, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री अखिलेश यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकण्यात येत नाही. मी केवल अखिलेशचा पिताच नाही तर एका पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. त्यामुळे मी केवळ सूचना करतो, मात्र कोणताही दबाव टाकत नाही, असेही मुलायमसिंग यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या पुढील कार्यक्रमांबाबत अधिक माहिती देण्यास मुलायमसिंग यांनी नकार दिला. मात्र सपा नेहमीच काँग्रेस आणि काँग्रेसच्या धोरणांचा विरोधात आहे, असे मुलायमसिंग यांनी सांगितले.
सपा हा लोकांचा पाठिंबा असलेला पक्ष आहे. त्यामुळे उमेदवारी मिळणाऱ्याला लोकांचा भरघोस पाठिंबा मिळेल असे स्पष्ट करताना सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे मतदारसंघ असलेल्या रायबरेली आणि अमेठीमधून उमेदवारी देण्याबाबत त्यांनी अधिक सांगण्यास नकार दिला.
या वेळी मुलायमसिंग यांनी गुजरातच्या विकासाबाबत टीका केली. उत्तर प्रदेशमध्ये राज्य सरकारने विविध कल्याणकारी योजना राबवल्या. मात्र प्रसारमाध्यमांनी त्याची योग्य दखल घेतली नाही, असा आरोप त्यांनी केला.