तेलंगण राज्याच्या निर्मितीसाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिगटासमोर विभाजनाचा पुनर्विचार करण्यासंदर्भात आपण जोरदारपणे बाजू मांडू, असे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. किरणकुमार रेड्डी यांनी बुधवारी येथे सांगितले. मंत्रिगटाची पहिली बैठक शुक्रवारी होत आहे. या मंत्रिगटाचे मन वळविण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. राज्य अखंड ठेवण्यास आपण बांधील असून पक्ष आणि केंद्राने घेतलेल्या या निर्णयाविरोधात आपण शेवटपर्यंत लढू. कारण हा निर्णय राज्याच्या हिताविरोधात आहे, या शब्दांत रेड्डी यांनी श्रेष्ठींच्या निर्णयास उघड आव्हान दिले आहे.
तेलंगण राज्याच्या निर्मितीविरोधात संपकरी कर्मचाऱ्यांच्या हेक्यामुळे वीजपुरवठय़ाचे संकट कायम असतानाच राज्याच्या किनारपट्टीस चक्रीवादळाच्या तडाखा बसण्याच्या शक्यतेमुळे आंध्र प्रदेश सरकारसमोरील अडचणी चांगल्याचा वाढल्या आहेत. उभयपक्षी वाटाघाटी निष्फळ ठरल्यानंतर आता परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी कर्मचाऱ्यांवर ‘जीवनावश्यक सेवा कायद्यांतर्गत’ (एस्मा)  कारवाई करण्याचा गंभीर विचार सरकार करीत आहे.
दरम्यान, वायएसआर काँग्रेसच्या प्रमुख वाय.एस. विजयम्मा यांनी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांची दिल्ली येथे भेट घेऊन स्वतंत्र तेलंगणाविरोधात आपल्या पक्षाने घेतलेल्या भूमिकेस भाजपने पाठिंबा द्यावा, अशी त्यांना विनंती केली.
वायएसआर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जगनमोहन रेड्डी यांनी बेमुदत उपोषण आरंभल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली आहे. रेड्डी यांच्या रक्तातील साखरेच्या पातळीत घट झाल्यामुळे त्यांनी तातडीने आपले उपोषण मागे घ्यावे, अशी सूचना डॉक्टरांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Would make strong case for united andhra kiran reddy on telangana
Show comments