एकीकडे मे महिन्यात किरकोळ महागाई दरात घट झाली आहे. त्याचबरोबर घाऊक महागाई दरातही वाढ झाली आहे. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, घाऊक महागाईचा दर मे महिन्यात १५.८८ टक्क्यांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे. हा मागील १० वर्षामधील उच्चांकी स्तर आहे. घाऊक महागाई दर वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे खनिज तेल, कच्चे तेल, नैसर्गिक वायू इत्यादींच्या किमतीत झालेली वाढ. एप्रिलमध्ये WPI महागाई दर १५.०८ टक्के होता. मे २०२१ मध्ये घाऊक महागाई दर १३.११ टक्के होता. म्हणजेच तेव्हापासून घाऊक महागाईत आताच्या तुलनेत २ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. देशात मागील १४ महिन्यांपासून सातत्याने हा महागाई दर १० टक्क्यांपेक्षा अधिक नोंदवण्यात आला आहे.

एका निवेदनात, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने म्हटले आहे की, “मे २०२२ मध्ये महागाईचा उच्च दर मुख्यत्वे खनिज तेल, कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू, अन्नपदार्थ, मूलभूत धातू, गैर-खाद्य वस्तू, रसायने आणि रासायनिक उत्पादने आणि खाद्यपदार्थ इत्यादींच्या किमती गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत वाढल्या असल्याने आहे.”

मे महिन्यात खाद्यपदार्थांची महागाई १२.३४ टक्के होती. या काळात भाजीपाला, गहू, फळे आणि बटाटे यांचे भाव वर्षभरापूर्वीच्या तुलनेत झपाट्याने वाढले. भाज्यांच्या किमतीत ५६.३६ टक्के, गहू १०.५५ टक्क्यांनी आणि अंडी, मांस आणि माशांच्या किमतीत ७.७८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

इंधन आणि ऊर्जा महागाई ४०.६२ टक्के, तर उत्पादित उत्पादने आणि तेलबियांमध्ये ती अनुक्रमे १०.११ टक्के आणि ७.०८ टक्के राहिली. कच्च्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूच्या महागाईचा दर मे महिन्यात ७९.५० टक्के होता. मे महिन्यात किरकोळ चलनवाढीचा दर ७.०४ टक्‍क्‍यांनी सलग पाचव्या महिन्यात रिझव्‍‌र्ह बँकेच्या उद्दिष्टापेक्षा जास्त राहिला.

Story img Loader