भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांचे सहकारी संजय सिंह यांनी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. त्यानंतर आंदोलनकारी कुस्तीपटूंमध्ये पुन्हा एकदा नाराजी पसरल्याची दिसते. संजय सिंह अध्यक्ष होताच बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगाटने नाराजी व्यक्त केली आहे. या तिघांनी कुस्तीपटूंच्या आंदोलनाचे नेतृत्व केले होते. आता कुस्तीपटू बजरंग पुनिया याने एक मोठा निर्णय घेतला आहे. “मी माझा पद्मश्री पुरस्कार प्रधानमंत्र्यांना परत करत आहे”, असे कॅप्शन लिहित बजरंगने एक पत्र एक्स या साईटवर पोस्ट केले आहे.

भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदासाठी आज (२१ डिसेंबर) निवडणूक पार पडली. संजय सिंह यांनी या निवडणुकीत माजी कुस्तीपटू अनिता शेरॉन यांचा पराभव केला. एकूण ४७ जणांनी या निवडणुकीत मतदान केलं. यापैकी ४० मतं संजय सिंह यांच्या पारड्यात पडली तर अनिता यांना केवळ सात मतं मिळाली.

हे वाचा >> “ज्यांना राजकारण करायचंय त्यांनी…”, कुस्ती महासंघाच्या नव्या अध्यक्षांनी आंदोलक कुस्तीपटूंविरोधात दंड थोपटले

बजरंग पुनिया याने पत्रात काय लिहिले?

कुस्तीपटू बजरंग पुनियाने आपल्या पत्रात लिहिले, “आशा आहे की, तुमची प्रकृती चांगली असेल. तुम्ही देशाच्या सेवेमध्ये व्यस्त असणार. तुमच्या व्यस्ततेदरम्यान मी आपले लक्ष कुस्तीकडे वळवू इच्छितो. आपल्याला माहितच आहे की, यावर्षी जानेवारी महिन्यात भारतीय महिला कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप लावले होते. त्या महिला कुस्तीपटूंनी आंदोलन सुरू केले, तेव्हा मीही त्यात सहभागी झालो होतो. सरकारने आंदोलकर्त्यांना ठोस आश्वासन दिल्यानंतर जानेवारी महिन्यातच कुस्तीपटू आपापल्या घरी निघून गेले. मात्र तीन महिन्यानंतरही ब्रिजभूषण सिंह यांच्यावर एफआयआरही दाखल झाला नव्हता.”

तक्रारदार महिलांवर दबाव टाकून त्यांना धमकावले

“एप्रिल महिन्यात कुस्तीपटूंनी पुन्हा एकदा आंदोलन केले. तरही ब्रिजभूषण सिंह यांच्यावर एफआयआर दाखल झाला नाही. शेवटी कुस्तीपटूंना न्यायालयात जाऊन एफआयआर दाखल करावा लागला. जानेवारीमध्ये तक्रारदार महिलांची संख्या १९ होती, जी एप्रिल महिना येईपर्यंत सात राहिली. म्हणजे केवळ तीन महिन्यात ब्रिजभूषण सिंहने आपल्या ताकदीच्या जोरावर १२ महिलांना न्याय मिळण्यापासून अडवले. आमचे आंदोलन ४० दिवस चालले या दिवसांत आणखी एक महिला मागे हटली. आमच्यावर खूप दबाव टाकला गेला. आंदोलन करू नये म्हणून दिल्लीच्या बाहेर काढण्यात आले”, असे पुढे पत्रात म्हटले.

पदक गंगेत वाहण्याचा निर्णय घेतला

आमच्यावर दबाव सातत्याने वाढत असल्यामुळे आम्ही आमचे पदक गंगा नदीत वाहण्याचा निर्णय घेतला. आम्ही पदक गंगेत सोडायला गेलो तेव्हा आमचे प्रशिक्षक आणि शेतकरी नेत्यांनी आम्हाला अडवले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आमच्याशी संवाद साधला. त्यात त्यांनी महिला कुस्तीपटूंना न्याय देण्याचा शब्द दिला होता. तसेच कुस्ती महासंघातून ब्रिजभूषण सिंह, त्यांचे कुटुंब आणि त्यांच्या साथीदारांना बाहेर करू, असेही आश्वासन दिले होते. अमित शाह यांचे ऐकून आम्ही आमचे आंदोलन समाप्त केले.

देवाची घरी अंधार नाही.. एकेदिवशी न्यायाचा विजय होईल

खेळामुळे आमच्या महिला खेळाडूंच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला. आता तुम्हाला प्रत्येक गावात महिला खेळाडू दिसतात. त्या देशात-परदेशात स्पर्धेसाठी प्रवास करतात. परंतु ज्यांचा दबदबा आहे, त्यांची सावली या महिला खेळाडूंवर दहशत घालते. ज्या मुलींना बेटी बचाओ, बेटी पढाओ, यासाठी ब्रँड अॅम्बेसेडर बनवायचे होते, त्यांना खेळातूनच माघार घ्यावी लागत आहे. महिला कुस्तीपटूंना अपमानित केल्यानंतर मी सन्माननीय बनून आयुष्य कसे काय व्यतीत करू? ही बोच मला आयुष्यभर राहिल. यासाठीच मी सन्मान परत करत आहे.

मी कोणत्या कार्यक्रमात जातो तेव्हा सूत्रसंचालक आम्हाला पद्मश्री, खेलरत्न आणि अर्जून पुरस्कारप्राप्त कुस्तीपटू म्हणून संबोधित करतात. तेव्हा उपस्थित लोक टाळ्या वाजवायचे. आता कुणी मला असे संबोधित करेल, तेव्हा मला माझीच लाज वाटेल. महिला मल्लांना जर मी सन्मानित जीवन देऊ शकत नसेल तर मी सन्मानित जीवन जगून काय करू? मला देवावर विश्वास आहे. त्याच्या घरात प्रकाश आहे. अन्यायावर एकदिवस नक्कीच न्यायाचा विजय होईल.

Story img Loader