Bajrang Punia Instagram Post : देशाची राजधानी दिल्लीतल्या जंतर-मंतर मैदानावर भारतीय कुस्तीपटू आंदोलन करत आहेत. या आंदोलनात कुस्तीपटू बजरंग पुनियादेखील सहभागी झाला आहे. या आंदोलनादरम्यान, बजरंग पुनियावर टीका सुरू झाली आहे. पुनियाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून बजरंग दलच्या समर्थनात एक पोस्ट केली होती. ही पोस्ट पाहून लोक त्याच्यावर टीका करू लागले. त्यानंतर काहीच मिनिटात बजरंगने त्याची पोस्ट डिलीट केली.
बजरंग पुनियाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हिंदुत्ववादी संघटना बजरंग दलच्या समर्थनात एक स्टोरी शेअर केली होती. यामध्ये त्याने एक फोटो अपलोड केला होता. ज्यावर लिहिलं होतं की, “मी बजरंगी, मी बजरंग दलचं समर्थन करतो”. तसेच या फोटोच्या कॅप्शनमध्ये बजरंग पुनियाने लोकांना आवाहन केलं होतं की, त्यांनी हा फोटो व्हॉट्सअॅप स्टेटस आणि डिस्प्ले पिक्चर म्हणून ठेवावा.
दरम्यान, हा फोटो पाहून बजरंग पुनियावर काही नेटकऱ्यांनी टीका सुरू केली. अनेकांनी त्याच्या स्टोरीचा स्क्रीनशॉट काढून दोगलापण (डबल ढोलकी), डबल स्टँडर्ड अशा कॅप्शनसह शेअर केला. त्यानंतर बजरंगने त्याची इन्स्टा स्टोरी डिलीट केली.
हे ही वाचा >> “काँग्रेसला २०१४ मध्ये धोका मिळाल्यामुळे…”, महाविकास आघाडीच्या जागावाटपावर नाना पटोलेंची भूमिका स्पष्ट
खरंतर काँग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी जो जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे, त्यात त्यांनी बजरंग दलवर बंदी घालू अशी घोषणा केली आहे. त्यामुळे बजरंग दलचे समर्थक काँग्रेसवर टीका करत आहेत. तसेच बजरंग दलच्या बचावासाठी पुढे आले आहेत.