कुस्तीपटू सागर राणा  याच्या हत्येच्या आरोपाखाली सुशील कुमार याला शुक्रवारी मंडोली जेलमधून तिहार येथे हलवण्यात आले.  यादरम्यान पोलिसांनी सुशील कुमारच्यासमवेत सेल्फी काढला. गंभीर आरोपांमध्ये अडकलेला सुशील कुमार या सेल्फीदरम्यान हसताना दिसून आला. त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले. हे फोटो समोर आल्यानंतर त्याला जेलमध्ये विशेष उपचार दिले जात आहेत का, शिवाय तो ऑलिम्पिकमध्ये जातोय की जेलमध्ये?, असे प्रश्नही सोशल मीडियावर विचारण्यात आले.

 

 

 

 

 

लॉरेन्स-काला टोळीच्या धमकीनंतर सुशीलला तिहारमध्ये हलवले

सुशीलने जेल प्रशासनाला सांगितले होते, की त्याला लॉरेन्स बिश्नोई-काला जठेडी टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. सूत्रांनी सांगितले होते, की सुशील मंडोली जेलमध्ये काळजीत दिसत होता. तो दिवसभर फिरत असायचा. २३ मे रोजी अटक झालेल्या सुशील कुमारचा पोलिस २ जूनला संपला. यानंतर त्याला मंडोली जेलमध्ये पाठविण्यात आले. सुशीलला स्वतंत्र सेलमध्ये १४ दिवस ठेवण्यात आले होते.

हेही वाचा – भारतातून टी-२० वर्ल्डकप ‘आऊट’..! आता ‘या’ देशात रंगणार क्रिकेटचा महासंग्राम

दिल्ली कोर्टाने सुशील कुमारच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली. १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर त्याला शुक्रवारी महानगर दंडाधिकारी मयंक अग्रवाल यांच्यासमोर हजर करण्यात आले. कोठडीत वाढ झाल्याने सुशीललाही तिहार जेलमध्ये हलविण्यात आले.

नेमके काय झाले होते?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशील कुमार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सागर धनखड आणि त्याच्या दोन मित्रांना ४ मे रोजी राजधानी दिल्लीतील छत्रसाल स्टेडिअममध्ये बेदम मारहाण केली होती. तिघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सागर धनखडचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. मालमत्तेवरील अतिक्रमण आणि ताबा सोडण्यासाठीची धमकी याचे पर्यवसान ४ मे रोजी मारहाणीत घडले आणि त्यात सागरची हत्या झाली, असे पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले.

घटनेनंतर फरार असलेल्या सुशील कुमारवर दिल्ली पोलिसांनी एक लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. याशिवाय अजय कुमारच्या अटकेसाठी ५० हजारांचे बक्षीस जाहीर झाले होते. ३७ वर्षीय सुशील कुमारला अटक करण्यासाठी पोलिसांनी दिल्ली तसेच शेजारच्या अनेक राज्यांमध्ये छापे टाकले होते. १८ मे रोजी सुशील कुमारने दिल्ली कोर्टात धाव घेत अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी केली होती. तपास एकतर्फी असून पीडितला झालेल्या दुखापतीशी आपला संबंध नसल्याचा दावा त्याने केला होता. मात्र कोर्टाने प्रथमदर्शी मुख्य आरोपी असून गंभीर आरोप असल्याचे सांगत अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली होती. नंतर त्याला अटक करण्यात आली.