हरयाणामध्ये कृषी कायद्याच्या मुद्द्यावरुन भाजपा आणि जजपाच्या (जननायक जनता पार्टी) नेत्यांचा विरोध केला जात आहे. मागील अनेक महिन्यांपासून सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाची धग पंजाब आणि हरयाणामध्ये अजूनही कायम आहे. आज येथील चरखी दादरीमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये पोहचलेल्या भाजपा नेत्या आणि महिला विकास मंडळाच्या प्रमुख बबीता फोगट यांचा स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केला. शेतकऱ्यांनी फोगट यांना काळे झेंडे दाखवले. यापूर्वीच संयुक्त किसान मोर्चाने योग दिनानिमित्त भाजपा आणि जजपाच्या नेत्यांना गावात शिरु दिलं जाणार नाही अशी भूमिका घेतली होती.

चरखी दादरीमध्ये आंदोलनाची शक्यता लक्षात घेत राज्य सरकारने कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता. मात्र कार्यक्रमामध्ये शेतकरी काळे झेंडे घेऊन पोहचले आणि मंचाच्या दिशेने चालू लागले तेव्हा पोलिसांनी त्यांना आडवण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना फोगट खाप प्रमुख बलवंत नंबरदार यांच्या नेतृत्वाखाली बबीता फोगटविरोधात घोषणाबाजी केली. जोपर्यंत कृषी कायदे रद्द केले जात नाहीत तोपर्यंत फोगट यांचा आम्ही अशाच पद्धतीने विरोध करत राहू अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.

खाप प्रमुख बलवंत नंबरदार यांनी न्यूज १८ शी बोलताना दिलेल्या माहितीनुसार भाजपा आणि जजपाच्या नेत्यांनी कोणत्याही कार्यक्रमासाठी गावांमध्ये येऊ नये असा इशारा आम्ही दिला होता. या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी गावात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलन करण्यात येईल असं आधीच सांगण्यात आलं होतं. सरकार सतत षडयंत्र रचून शेतकरी आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप बलवंत नंबरदार यांनी केला. मात्र आपल्या शेतकऱ्यांचा दृढ निश्चय असून मागण्या पूर्ण झाल्यानंतरच ते घरी परतणार आहेत, असं विश्वास बलवंत नंबरदार यांनी व्यक्त केला. सरकारने वेळीच यासंदर्भात जागृक व्हावं. शेतकरी सरकारसोबत चर्चा करण्यास तयार आहेत. यासाठी कोणत्याही अटीशिवाय सरकारने शेतकऱ्यांना चर्चेला बोलवलं पाहिजे. शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी शेतकरी आणि सरकार असे दोन्ही बाजूने प्रयत्न करण्यात आले पाहिजेत, असं मत बलवंत नंबरदार यांनी व्यक्त केलं.

Story img Loader