Wrestler Vinesh Phogat joins farmers’ Protest: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या ५० किलो वजनी गटात अंतिम फेरी गाठून कुस्तीपटू विनेश फोगटने विक्रम प्रस्थापित केला होता. पण दुर्दैवाने वजन वाढल्यामुळे तिला अंतिम सामन्यातून बाद करण्यात आले. त्यानंतर देशात परतलेली विनेश आता आखाड्याबाहेर समाजकारणात सक्रिय झालेली दिसत आहे. विनेश फोगटने दिल्लीच्या शंभू सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. “तुमची मुलगी तुमच्याबरोबर आहे”, असा संदेश विनेशने यावेळी दिला. शंभू सीमेवरील आंदोलनाला आज २०० दिवस होत आहे. त्या पार्श्वभूमीवर विनेशने शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला.
२०० दिवसांपासून आंदोलन सुरू
१३ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांचा मोर्चा राजधानी दिल्लीकडे निघाला होता. मात्र पोलिसांनी शंभू सीमेवरच शेतकऱ्यांना रोखून धरले. त्यानंतर शेतकऱ्यांनी याठिकाणी आंदोलन सुरू केले. किमान आधारभूत किंमतीला कायदेशीर मान्यता मिळवून द्यावी, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
शेतकरीच देश चालवितात
शंभू सीमेवर आल्यानंतर विनेश फोगट यांनी शेतकऱ्यांसमोर भाषण केले. तसेच मी शेतकरी कुटुंबात जन्माला आले, याचा मला अभिमान वाटतो, असेही त्या म्हणाल्या. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत त्यांची मुलगी शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे, असेही त्या म्हणाल्या. “मी शेतकरी कुटुंबात जन्मले याचा मला अभिमान वाटतो. आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कुणीही पुढे येणार नाही. आपल्यालाच आपली लढाई लढावी लागणार आहे. मी देवाकडे प्रार्थना करते की, तुमच्या मागण्या लवकरच पूर्ण व्हाव्यात”, असे विनेश फोगट म्हणाल्या.
“२०० दिवसांपासून शेतकरी आंदोलनाला बसले आहेत, हे पाहून दुःख होते. शेतकरीच देशाला चालवितो. त्यांच्याशिवाय देश काहीच नाही, आम्ही खेळाडूही त्यांच्यासमोर काहीच नाही. त्यांनी जर अन्न दिले नाही तर आम्ही स्पर्धा करू शकत नाही. मी खेळाडू म्हणून शेतकऱ्यांसाठी काही करू शकत नाही, हे पाहून कधी कधी लाचारी वाटते. त्यामुळे सरकारकडे निवेदन करते की, त्यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे. मागच्या वेळी सरकारने आपली चूक मान्य करत तीन कृषी कायदे मागे घेतले होते. त्यामुळे यावेळीही शेतकऱ्यांच्या मागण्याकडे लक्ष द्यावे”, अशी मागणी विनेश फोगटने माध्यमांशी बोलत असताना केली.
हे ही वाचा >> विश्लेषण : ऑलिम्पिक अंतिम फेरीसाठी विनेश फोगट अपात्र कशी ठरली?
त्या पुढे म्हणाल्या, “शेतकरी जर असा अनेक दिवस आंदोलनाला बसून राहिला तर देशही पुढे जाणार नाही. २०० दिवस आंदोलनाला बसूनही शेतकऱ्यांचे धैर्य कमी झालेले नाही. मीही दिल्लीत आंदोलनाला अनेक दिवस बसले होते. पण आज इथे आल्यावर दिसले की, पहिल्या दिवसासारखाच उत्साह शेतकऱ्यांमध्ये आहे. आता आमच्या कुटुंबालाही लढण्याची युक्ती कळली आहे. आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरावेच लागते.”
राजकारणाची मला कल्पना नाही
हरियाणा विधानसभेसाठी १ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. या मतदानावर काही परिणाम होणार का? असा प्रश्न विचारला असता विनेश फोगट म्हणाल्या की, मला राजकारणाचे ज्ञान नाही. मला त्याचा काही अनुभव नाही. त्यामुळे राजकारणावर मी काही बोलू शकत नाही. मला खेळांबद्दल विचारले तर मी सांगू शकेन.