संजय सिंह यांची रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या (भारतीय कुस्ती महासंघ) अध्यक्षपदी निवड झाली आहे. संजय सिंह हे कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांचे जवळचे सहकारी आहेत. बृजभूषण सिंह यांनी अनेक महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण केल्याचे त्यांच्यावर आरोप आहेत. या आरोपांनंतर बृजभूषण यांच्यावर कारवाईची मागणी करत अनेक कुस्तीपटूंनी दिल्लीत ४० दिवसांहून अधिक काळ आंदोलन केलं होतं. या आंदोलनानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याव्यतिरिक्त दुसरी कुठलीही मोठी कारवाई झाली नाही. परंतु, कुस्तीपटूंच्या मागणीनंतर बृजभूषण यांना कुस्ती महासंघांची निवडणूक लढवता आली नाही. दरम्यान, त्यांचेच सहकारी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष झाल्याने कुस्तीपटू निराश झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कुस्ती महासंघाच्या निवडणुकीच्या निकालावर अनेक कुस्तीपटूंनी नाराजी व्यक्त केली आहे. संजय सिंह निवडणूक जिंकल्यानंतर ऑलिम्पिक पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिकने कुस्तीला कायमचा रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. तर साक्षीपाठोपाठ कुस्तीपटू बजरंग पुनिया यानेही मोठा निर्णय घेतला. बजरंग पुनियाने त्याचा पद्मश्री पुरस्कार परत केला आहे. बजरंगने शुक्रवारी (२२ डिसेंबर) रात्री दिल्लीत पंतप्रधान निवासाबाहेरच्या फूटपाथवर (पदपथ) त्याचं पदक ठेवलं आणि तिथून निघून गेला. दरम्यान, आता आणखी एका कुस्तीपटूने पद्म पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे.

दिग्गज कुस्तीपटू वीरेंद्र सिंह याने पद्मश्री पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे. वीरेंद्रने एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर याची घोषणा केली आहे. आपल्या पोस्टमध्ये त्याने म्हटलं आहे की, “मी माझी बहीण आणि आपल्या राष्ट्रकन्येच्या सन्मानासाठी पद्मश्री पुरस्कार परत करेन.” वीरेंद्रने पंतप्रधानांना उद्देशून म्हटलं आहे की, “मला माझी मुलगी आणि माझी बहीण साक्षी मलिक हिचा अभिमान आहे.”

कुस्तीपटू वीरेंद्र सिंह याने आपल्या पोस्टमध्ये दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि ऑलिम्पिक पदकविजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा या दोघांना टॅग केलं आहे आणि दोघांना विनंती केली आहे की, त्यांनी या प्रकरणावर त्यांचं मत व्यक्त करावं. वीरेंद्र सिंह याने डेफलिम्पिकमध्ये तीन सुवर्णपदकं आणि दोन रौप्यपदकं पटकावली आहेत. २०२१ मध्ये त्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

हे ही वाचा >> पद्म पुरस्कार परत करता येतो का? बजरंग पुनियाचे पुरस्कार परत करणे नियमाला धरून आहे का?

बजरंग पुनिया याने पत्रकार परिषदेत म्हटलं होतं की, जर आपल्या महिला कुस्तीपटूंना योग्य सन्मान मिळणार नसेल तर मी या सन्मानास पात्र नाही. आम्ही ४० हून अधिक दिवस रस्त्यावर ठिय्या आंदोलन केलं. त्यानंतर सरकारने आम्हाला काही आश्वासनं देत आंदोलन मागे घ्यायला लावलं. परंतु, सरकारने दिलेलं एकही आश्वासन पूर्ण केलं नाही. आमची लढाई सरकारविरोधात नाही. आमची लढाई केवळ एका व्यक्तीविरोधात आहे. माझा या देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. परंतु, सध्या जे काही घडतंय ते पाहून माझा आपल्या व्यवस्थेवरून विश्वास उडत चालला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wrestler virender singh will also return padma shri award as sanjay singh become wfi president asc