महिलादिनी केलेल्या भाषणात कन्हैया कुमारने काश्मीरमध्ये भारतीय सैनिक बलात्कार करत असल्याचे म्हटले होते. या भाषणाचा व्हिडिओदेखील प्रसिद्ध झाला असून, आपले विधान अयोग्य प्रकारे दर्शविल्याचे कन्हैयाने म्हटले आहे.
भारतीय सैनिकांविषयी कन्हैयाने केलेल्या वक्तव्यावरून ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्त चांगलाच खवळला आहे. योगेश्वरने टि्वटरच्यामाध्यामातून कन्हैयावर प्रहार करताना त्याचा ‘साप’ असा उल्लेख केला आहे. काही लोकांनी सापाला दूध पाजले आहे. आता तो आमच्या सैनिक बांधवांवर आरोप करत विष ओकत असल्याचे योगेश्वरने टि्वटरवरील संदेशात म्हटले आहे. योगेश्वरचे हे टि्वट आतापर्यंत अनेकांनी रिटि्वट केले आहे.
या आधी जेएनयूमधे देण्यात आलेल्या देशविरोधी घोषणांबाबतदेखील योगेश्वरने आपली नाराजी व्यक्त केली होती. संसदेवर हल्ला करणाऱ्या अफजल गुरूला हुतात्मा संबोधण्याबाबत प्रतिक्रिया देताना, अफजलला हुतात्मा संबोधणार, मग हनुमंतअप्पा यांना काय म्हणणार असा प्रश्न योगोश्वरने उपस्थित केला होता.
जेएनयू प्रकरणानंतर कन्हैया कुमारविषयी समाजात मतमतांतरे पाहायला मिळत आहेत. काही जण कन्हैयाच्या बाजूने आपले मत व्यक्त करत आहेत, तर काही जण त्याच्या विरोधात भूमिका मांडत आहेत.

Story img Loader