श्रीनगर भल्या पहाटे सीमा सुरक्षा दलाच्या कॅम्पवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याने हादरुन गेलं. पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास झालेल्या या हल्ल्यात बीएसएफचे ३ जवान जखमी झाले असून, दोन अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आल्याची माहिती बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. मात्र या हल्ल्यानंतर भारताचा कुस्तीपटू योगेश्वर दत्त याने संताप व्यक्त केला आहे. दहशतवाद देशात आता नेहमीची गोष्ट झाली असल्याचं म्हणत आपल्या देशाला दहशतवादाचा ‘कॅन्सर’ जडला आहे, अशी उद्विग्नता त्याने ट्विटरवरून व्यक्त केली.
आतंकी हमला आम बात हो गयी है,सारे विश्व मे ये कैन्सर जड़ जमा चुका है।क्या चाहते है आख़िर ये?अकेले रहेंगे सारी धरती पर?मर जाए या मार दे?पागलपन https://t.co/nIjE211KhV
— Yogeshwar Dutt (@DuttYogi) October 3, 2017
या हल्ल्याला योगेश्वरने ‘मुर्खपणा’ म्हटलं आहे. अतिरेक्यांना नेमकं हवंय तरी काय, असा सवाल त्यानं केला आहे. सध्या देशात दहशतवादी हल्ले ही नेहमीचीच बाब झाली आहे. ही ‘कीड’ संपूर्ण जगाला लागली असल्याचंही योगेश्वरनं ट्विटमध्ये म्हटलंय. २०१२ साली झालेल्या लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत योगेश्वर दत्तने फ्रिस्टाईल कुस्ती प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली होती. याव्यतिरीक्त अनेक राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय स्पर्धांमध्ये योगेश्वरने भारताचं नाव मोठं केलं आहे. जेएनयूमधील भारतविरोधी घोषणांचं प्रकरण, लष्करी तळांवर होणारे अतिरेकी हल्ले यांसारख्या घटनांवर योगेश्वर सोशल मीडियावर नेहमी आपलं मत मांडत असतो.
दरम्यान, या हल्ल्यानंतर श्रीनगर विमानतळावर सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश बंद केला असून, काही विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. सध्या श्रीनगर आणि आजूबाजूच्या परिसराला बीएसएफच्या जवानांनी वेढा घातला आहे. ९ तासांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर हे ऑपरेशन संपलं असून सर्व अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराच्या जवानांना यश आल्याचं कळतंय.