Wrestlers Protest: बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करत कुस्तीगीरांनी आंदोलन पुकारलं आहे. २८ मे रोजी या सगळ्या कुस्तीगीरांना जंतरमंतर या ठिकाणाहून हटवण्यात आलं. त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं होतं. मात्र नंतर सोडून दिलं. यानंतर या सगळ्या कुस्तीगीरांनी आपली पदकं गंगा नदीत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला. हरिद्वार या ठिकाणी हे सगळे गेलेही होते. मात्र शेतकरी नेते नरेश टिकैत यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर त्यांनी सरकारला पाच दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. आता या सगळ्या घटनांबाबत केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
काय म्हटलं आहे आहे अनुराग ठाकूर यांनी?
“कुस्तीगीरांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे त्यावर मी त्यांना सांगू इच्छितो की नरेंद्र मोदी सरकारने खेळांसाठीचं बजेट ८७४ कोटींवरून २७८२ कोटींवर नेलं आहे. खेलो इंडिया सारख्या योजना आणल्या आहेत. टॉप सारख्या मंचाच्या माध्यमातून अनेकांना संधी मिळाली आहे. खेळाडूंच्या प्रशिक्षणावरही कोट्यवधींचा खर्च केला जातो. खेळाडूंच्या प्रशिक्षणात कुठलीही कमतरता ठेवण्यात आलेली नाही. आम्ही जे करतो आहोत ते खेळाडूंची जी अपेक्षा आहे त्यापेक्षा जास्त करत आहोत असा आमचा प्रयत्न आहे. अशात काही रेसलर्स ही मागणी करत आहेत की त्यांचा छळ झाला त्यानंतर आम्ही तातडीने कमिटी स्थापन केली. ही कमिटी आम्ही त्याच्याशी चर्चा करुन स्थापन केली आहे. रात्री दोन वाजता घोषणा केली. त्यांनी सांगितलेल्या सदस्यांना आम्ही घेतलं. कमिटीने निष्पक्षपातीपणाने चौकशी केली. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केली. सर्वोच्च न्यायालयातही प्रकरण गेलं. ज्या ज्या गोष्टी करायला सांगितल्या त्या केल्या. आम्ही आमच्याकडून कमी पडलो नाही.
जेव्हा आरोप होतात तेव्हा चौकशी होते चौकशी पूर्ण होईपर्यंत वाट बघा
कुस्तीगीरांचं सगळं म्हणणं आम्ही ऐकलं. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. तुम्ही ७५ वर्षांचा इतिहास पाहा, जेव्हा असे आरोप होतात तेव्हा चौकशी होते. चौकशी होईपर्यंत वाट बघा. जर तुम्हाला वाटलं तर नंतर आंदोलन करा. मात्र तुम्हाला पोलीस, सर्वोच्च न्यायालय, समिती यापैकी कुणावर तरी विश्वास ठेवावा लागेल. आम्हालाही वाटतं आहे की जो मुद्दा समोर आलाय त्याची निष्पक्षपणे चौकशी केली जावी. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी. मात्र कुस्तीगीरांनी असं कुठलंच पाऊल उचलायला नको की ज्यामुळे इतर खेळाडूंना त्रास होईल.” असं अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे.