गेल्या वर्षी १२ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये जीवघेणा हल्ला झाला होता. एका कार्यक्रमात व्याख्यानासाठी ते आले असता त्यांच्यावर चाकूने वार करण्यात आले. या हल्ल्यात त्यांना आयुष्यभरासाठी एका डोळ्याने अंधत्व आलं. मात्र, या हल्ल्यानंतर गेल्या नऊ महिन्यांत सलमान रश्दी यांच्याकडून जागतिक पटलावर कोणतीही ठोस भूमिका मांडण्यात आल्याचं पाहायला मिळालं नाही. अखेर मंगळवारी सलमान रश्दींनी पाश्चात्य देशांमधील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर रोखठोक भूमिका मांडली.
सलमान रश्दींना ब्रिटिश बुक अवॉर्ड पुरस्कार कार्यक्रमात ‘फ्रीडम टू पब्लिश’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमात बोलताना सलमान रश्दींनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आपली स्पष्ट भूमिका मांडताना पाश्चात्य देशांमध्ये या स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याची भीती व्यक्त केली.
काय म्हणाले सलमान रश्दी?
“आत्ता मी अमेरिकेत बसलो आहे. मी इथे ग्रंथालयांवर आणि शाळांमधील लहान मुलांसाठीच्या पुस्तकांवर होणारे अनाकलनीय हल्ले पाहातो आहे. हे हल्ले ग्रंथालय या मूळ संकल्पनेवरच होऊ लागले आहेत. हा अत्यंत गंभीर असा धोक्याचा इशारा आहे. आपल्याला या धोक्याची जाणीव असायला हवी. आपण याच्याविरोधात सक्षम लढा उभारायला हवा”, असं रश्दी या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी झाले असताना म्हणाले.
विश्लेषण : जीवघेण्या हल्ल्यातून कसे बचावले सलमान रश्दी? नव्या पुस्तकात काय?
पुस्तकांच्या पुनर्लेखनालाही केला विरोध
दरम्यान, जुन्या काळातील पुस्तकांमधली आक्षेपार्ह भाषा वगळून ती पुस्तकं पुन्हा लिहिण्याच्या प्रकारालाही त्यांनी तीव्र विरोध केला. “ही पुस्तकं थेट ती लिहिली गेलेल्या काळातून आपल्याला भेटली पाहिजेत. त्यांच्या काळातलीच राहिली पाहिजेत. जर ते अवघड असेल, तर मग तुम्ही ती वाचूच नका. दुसरं पुस्तक वाचा”, असं ते म्हणाले.
काय झालं होतं नऊ महिन्यांपूर्वी?
१२ ऑगस्ट २०२२ रोजी सलमान रश्दी यांना पश्चिम न्यूयॉर्कमध्ये चौटौका इन्स्टिट्युटमध्ये एका कार्यक्रमात व्याख्यानासाठी पाचारण करण्यात आलं होतं. यावेळी ते व्यासपीठावर उपस्थित असताना त्यांच्या व्याख्यानापूर्वीच हल्लेखोरानं त्यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. आधी हल्लेखोराने त्यांना धक्काबुक्की केली आणि नंतर चाकूचे वार केले. नंतर न्यूयॉर्क पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सलमान रश्दींना एका डोळ्याने कायमचं अंधत्व आलं.