नोकरीच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ होत असल्यास त्याच्या तक्रारी करण्यासाठी महिला व बालविकास मंत्रालयाने आज ‘शी-बॉक्स’ हे पोर्टल सुरू केले आहे. त्यावर केंद्र सरकारच्या नोकरीत असलेल्या महिलांना लैंगिक छळ होत असल्यास तक्रारी करता येतील. नोकरीच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ होण्याचे प्रमाण किती आहे याची देशव्यापी पाहणी करणार असल्याचे महिला व बालविकास मत्री मनेका गांधी यांनी पोर्टल सुरू केल्यानंतर त्यांच्या कार्यालयात बोलताना सांगितले.

शी-बॉक्स हे पोर्टल जितके परस्परसंवादी करता येईल तितके करावे अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. केंद्र सरकारच्या महिला कर्मचाऱ्यांना लैंगिक छळाच्या तक्रारी दाखल करता याव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असले तरी त्यात खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांत असलेल्या महिलांनाही समाविष्ट केले जाईल असे मनेका गांधी यांनी सांगितले. ऑनलाईन व्यवस्थेत काही बदल करण्याची गरज आहे. ते केल्यानंतर खासगी नोकऱ्यांतील महिलाही तक्रारी या पोर्टलवर सादर करू शकतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

लैंगिक छळाच्या तक्रारींसाठी ऑनलाइन मंच उपलब्ध करून देण्याची घोषणा गेल्या ऑक्टोबरमध्ये करण्यात आली होती. विविध मंत्रालयातील महिलांनीच लैंगिक छळाच्या तक्रारी श्रीमती गांधी यांच्याकडे केल्या होत्या.

केवळ पाच जणांना शिक्षा

नोकरीच्या ठिकाणी लैंगिक छळाच्या गुन्ह्य़ांची नोंद घेण्याची कुठलीही केंद्रीभूत व्यवस्था नाही पण राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने २०१४ पासून कामाच्या ठिकाणी विनयभंग व इतर  गुन्ह्य़ांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. २०१५ च्या आकडेवारीनुसार ११९ गुन्हे यात दाखल झाले त्यात ७१ लोकांवर आरोपपत्रे ठेवण्यात आली तर एकूण पाच जणांना शिक्षा झाली.

Story img Loader