चीनचे राष्ट्रपती क्षी जिनपिंग यांनी “हाँगकाँगवर चीनचं संपूर्ण नियंत्रण आलं आहे, आता तैवानची पाळी आहे,” असं मत व्यक्त केलं. तसेच एकतर्फीपणा, संरक्षणवाद आणि खोडसाळपणाला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, असंही यावेळी जिनपिंग यांनी म्हटलं. ते रविवारी (१५ ऑक्टोबर) कम्युनिस्ट पक्षाच्या पाच वर्षातून एकदा होणाऱ्या बैठकीत बोलत होते. बीजिंगमधील ‘ग्रेट हॉल ऑफ द पीपल’ येथे ही बैठक पार पडली.
जिनपिंग म्हणाले, “चीन नव्या प्रकारचे आंतरराष्ट्रीय संबंध निर्माण करण्याला प्रोत्साहन देत आहे. हे संबंध जागतिक शासन प्रणालीत सुधारण आणि निर्माणात सक्रीय भूमिका निभावतील. आगामी काळात चिनी मार्क्सवादाचं नवं क्षेत्र खुलं करण्यात येईल.”
“तैवानबाबतचा वाद सोडवणं हा चीनचा प्रश्न आहे आणि तो प्रश्न चीनचे लोकच सोडवतील. मात्र, तैवान आणि चीनच्या एकीकरणासाठी गरज पडल्यास आम्ही बळाचा वापर करण्यासही मागेपुढे पाहणार नाही. आवश्यक उपाययोजना करण्याचे सर्व मार्ग आमच्यासाठी खुले असतील,” असंही जिनपिंक यांनी नमूद केलं.
हेही वाचा : विश्लेषण : क्षी जिनपिंग पुन्हा ठरणार चीनमध्ये सर्वसत्ताधीश? कम्युनिस्ट पक्षाच्या अधिवेशनाचे महत्त्व काय?
६९ वर्षीय क्षी जिनपिंग माओत्से तुंग यांच्यानंतर चीनचे सर्वात बलाढ्य नेते म्हणून समोर येत आहेत. आगामी काळात होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत जिनपिंग यांची पुन्हा एकदा पक्षाचे सरचिटणीस म्हणून नियुक्ती होणार आहे.