बीजिंग : तिबेटमधील ब्रह्मपुत्र महानदीवर चीन जगातील सर्वांत मोठे धरण बांधणार असून १३७ अब्ज डॉलरच्या या प्रकल्पाला अलीकडेच मंजुरी देण्यात आली आहे. सीमेपासून अत्यंत जवळ होणाऱ्या या महाप्रकल्पामुळे भारत-बांगलादेशच्या चिंतेत भर घातली आहे. या जलविद्युत प्रकल्पातून वर्षाला तब्बल ३०० अब्ज किलोवॉट वीजनिर्मितीचे चीनचे उद्दिष्ट आहे.
हिमालयाच्या पर्वतरांगांमधून वाहणाऱ्या ब्रह्मपुत्रला तिबेटमध्ये ‘येरलंग झांग्बो नदी’ या नावाने संबोधले जाते. या महानदीने तयार केलेल्या जगातील सर्वांत खोल दरीनंतर उलट दिशेने नदीचा प्रवास सुरू होतो. या दरीमध्ये प्रचंड मोठी भिंत बांधण्यात येणार असून वीजनिर्मितीसाठी २० किलोमीटर लांबीचे चार ते सहा महाकाय बोगदे ‘नामचा बारवा’ डोंगररांगांमध्ये खणावे लागणार आहेत. हा प्रकल्प ‘थ्री गॉर्ज डॅम’ या चीनमधल्याच सध्याच्या सर्वांत मोठ्या धरणाला मागे सारेल, असे चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.
धरणाची निर्मिती करताना चीनला प्रचंड मोठ्या अभियांत्रिकी आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. हा संपूर्ण परिसर भूकंपप्रवण आहे. ‘जगाची गच्ची’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिबेटी पठार ‘टेक्टॉनिक प्लेट’वर असल्यामुळे तेथे सतत भूगर्भीय हालचाली होत असतात. त्यामुळे धरणाचा पाया आणि भिंती उभारताना अभियंत्यांची कसोटी लागणार असल्याचे मानले जात आहे.
हेही वाचा >>> आई-वडिलांनी इंजिनिअर बनवलं, मुलगा रिक्षाचालक झाला; तृतीयपंथी जोडीदाराशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यावर पालकांनी…
या प्रकल्पामुळे तिबेटला वर्षाला ३ अब्ज डॉलरचे उत्पन्न मिळू शकेल, असा दावा चीनच्या पॉवर कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशनचे तत्कालिन अध्यक्ष यान झियोंग यांनी काही वर्षांपूर्वी केला होता.
भारतबांगलादेशला धोक्याचा इशारा
महाकाय धरणामुळे ब्रह्मपुत्राच्या पाण्याचे नियोजन चीनच्या हाती जाण्याची भीती भारत आणि बांगलादेशला आहे. भारतही अरुणाचल प्रदेशात ब्रह्मपुत्रावर मोठे धरण बांधत असून तिबेटमधील प्रकल्पाचा फटका याला बसू शकतो. तसेच तणावाच्या स्थितीत धरणातून अधिक पाण्याचा विसर्ग करून चीन सीमाभागात कृत्रिम पूरस्थिती निर्माण करू शकतो, अशीही भीती आहे.