एपी, किव्ह : युक्रेनमध्ये दहा महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी शुक्रवारी दुरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्स) चर्चा केली. यावेळी त्यांनी द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याचा संकल्प केला. दरम्यान, रशियाने युक्रेनवर गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी पहाटे ड्रोन आणि रॉकेटद्वारे जोरदार हल्ला केला.
पुतिन आणि शी यांनी चर्चेदरम्यान युक्रेनचा थेट उल्लेख टाळला. परंतु त्यांनी ‘भू राजकीय तणाव’ आणि कठीण आंतराष्ट्रीय स्थिती’मध्ये मास्को आणि बीजिंग यांच्यातील अधिक मजबूत होत असलेल्या संबंधांचे कौतुक केले.
पुतिन यांनी सांगितले की, वाढत्या भू राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर रशिया आणि चीन यांच्यातील राजकीय संबंध अधिक दृढ होत आहेत.
पुतिन यांनी क्षी यांना वसंत ऋतूत मास्को भेटीचे आवाहन दिले. तसेच चर्चा करताना दोन्ही देशांमध्ये लष्करी सहकार्याला ‘विशेष स्थान’ आहे, असे नमूद केले.
क्षी यांनी सांगितले की, चीन रशियाबरोबर राजकीय सहकार्य वाढविणे आणि परस्परांच्या विकासाच्या संधी निर्माण करण्यास तयार आहेत.
दरम्यान, रशियाने युक्रेनवर केलेल्या ताज्या हल्ल्यात ऊर्जा केंद्र आणि अन्य महत्त्वाच्या ठिकाणांचे मोठे नुकसान झाल्याचे युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच मृतांची संख्या वाढल्याचेही नमूद केले.
युक्रेनवर २४ तासांत ८५ क्षेपणास्त्रे
गेल्या काही आठवडय़ांपासून रशियाच्या सैन्याने युक्रेनवर भीषण हल्ला केला आहे. युक्रेनच्या राष्ट्रपतींच्या कार्यालयाचे उप प्रमुख किरिलो टिमोशेंको यांच्या म्हणण्यानुसार हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. युक्रेन लष्कराच्या म्हणण्यानुसार रशियाने गेल्या २४ तासांत प्रमुख ठिकाणे लक्ष्य करताना ८५ क्षेपणास्त्रे डागली.